जळगाव लाईव्ह न्यूज | ११ सप्टेंबर २०२३ | आठवड्यावर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळाची लगबग वाढली आहे. सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळ उभारणीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. पोलीस, महापालिका, महावितरण यांच्या रितसर परवाणगीसाठीही मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गणरायाचे आगमन, महाप्रसाद आणि समारोप यासाठी नियोजन सुरू आहे. मात्र गत वर्षाप्रमाणे यंदाही जळगाव शहरातील गणेश मंडळांना टेन्शन आहे ते, गणेश स्वागत मार्गांवर पडलेले खड्डे आणि खाली आलेल्या विद्युततारांचे!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री आगमन नियोजन या विषयावरील बैठक गायत्री मंदिरात झाली. बैठकीत श्रीच्या स्वागत मार्गावर उंच मूर्तींना वीजतारांच्या अडचणी, रस्त्यावरील खड्डे, जुन्या मंडळांना पंचवार्षिक परवानगीबद्दल मंजुरी, मंगळवारपासून सुरू होणारी एक खिडकी योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गतवर्षाप्रमाणे यंदाही शहरातील गणेश स्वागत मार्गांवर पडलेले खड्डे आणि खाली आलेल्या विद्युततारा गणेश मंडळांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहेत. महावितरण व महापालिका प्रशासनाने हे विघ्न तातडीने दूर करावे, अशी मागणी गणेश मंडळांनी केली आहे. या बैठकीत विविध उपक्रमांतील सहभागाची माहिती देण्यात आली. जे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत उपस्थित राहतील त्यांनाच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ पूर्ण सहकार्य करेल, अशी सूचनाही करण्यात आली. महामंडळाची पुढील बैठक दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.