⁠ 
रविवार, मे 19, 2024

जिल्ह्यात कुपोषणाची परिस्थिती गंभीर; तब्बल ८ हजार चिमुकले कुपोषणाच्या वेढ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। जळगाव जिल्ह्यात कुपोषणाची परिस्थिती ही गंभीर असल्याची दिसून येते. जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार बाळांचे स्क्रीनींग करण्यात आले असुन, त्यात तब्बल १ हजार ८८९ बाळ अतितीव्र कुपोषीत, तर ७ हजार ३२६ बाळ सौम्य कुपेाषीत आढळले आहेत.

जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब असून, कुपोषण मुक्तीसाठी येत्या १ सप्टेंबरपासुन विषेश मोहिम राबवली जाणार आहे. बालकांच्या आकाराकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, बुधवारी (ता. २४) त्यांनी एक महिन्याच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या आंगणवाडी सर्वेक्षणातून आलेली आकडेवारी संबधीत विभागातर्फे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली.

त्यानुसार जिल्ह्यात ३ हजार ५४३ आंगणवाड्या असून, ग्रामीण व शहरी अशा २२ प्रकल्पांतर्गत गर्भवती माता, नवजात शिशु आणि बाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ हजार ८८९ बालके अतितीव्र, तर ७ हजार ३२६ बालके मध्यम कुपोषित असल्याचे सांगण्यात आले.या विषयाला गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कुपोषण मुक्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने युद्धपातळीवर काम करण्याच्या सुचना संबधीत विभागाला दिल्या.

जळगाव जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण पाहता ही परिस्थीती गंभीर असून, आरोग्य विभागात खुप काम करण्याची गरज असल्याचे मत जिल्‍हाधिकारी यांनी व्यक्त केले. केळी फळासाठी प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात कुपोषित बालकांची सख्या वाढणे गंभीर असून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य यातून बाधीत होणार आहे.

म्हणुन पालकांनी आपल्या बाळाकडे लक्ष द्यावे. किमान एक केळ शरिराला पोषण देऊन जाते. माता व बालकांच्या आहारात त्याचा समावेश केल्यास तीव्र कुपोषणावर मात करता येईल. आरोग्य विभागाने कुपोषणाच्या विषयाला गांभीर्याने घ्यावे, अशा सुचनाही त्यांनी या वेळी केल्या.