जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्याने शेती परवडत नाही, हा समज धरून न राहता पिकवलेली केळी थेट इराण, इराक या आखाती देशात पोहचली आहे. पारंपारिक पद्धतीवर अवलंबून न राहता बदल स्वीकारून शेतीच्या बाबतीत काळाला अनुसरून पिके घेऊन यशस्वी शेती करण्याच्या प्रयोगाला यश मिळालेले आहे.
स्थानिक बाजारपेठेपेक्षा आखातात जाणाऱ्या केळीला अधिक भाव मिळत आहे. मुंबईच्या कंपनीकडून थेट बांधावरच केळी खरेदी करून ती मुंबईला नेऊन तेथे पॅकिंग करून आखातात रवाना होत आहे. वरखेडे येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. संभाजी भाऊराव चौधरी यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रावर जैन टिश्यू कल्चरची साडेचार हजार झाडांची लागवड गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केली. केळीसाठी केलेल्या अथक परिश्रमाला आज यश मिळाले.
जैन टिशू कल्चर रोपाची लागवड केलेल्या केळीच्या बागेसाठी सुरुवातीपासून उत्कृष्टपणे नियोजन त्यांनी केले. परिपक्व झालेल्या केळीच्या कापणीला सुरूवात झाली. सुरूवातीला स्थानिक केळी व्यापाऱ्यांकडून केळी विकत घेतली. डॉ. चौधरी यांनी लागवड केलेली केळी दर्जेदार असल्याने भोपाळ येथील श्रीक्रिष्णा फूड कंपनीने त्यांच्याशी संपर्क साधला.
कंपनीने थेट चौधरी यांच्या शेताच्या बांधावर येऊन केळी खरेदीला सुरूवात केली. स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जास्तीचा भाव त्यांना मिळाला. श्री क्रिष्णा (एसके) फ्रूट कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर प्रमोद चौगुले व एरिया मॅनेजर तुषार चौधरी यांच्याकडून ही केळी खरेदी करून ती मुंबई वाहनाने नेऊन तेथून जहाजाद्वारे इराण, इराक या देशांमध्ये रवाना करण्यात आली. दोन दिवसात सुमारे दोनशे क्विंटल केळी वरखेडे येथून आखातात रवाना झाली.
शेती परवडत नाही म्हणून रडत कडत न बसता बदलल्या काळाचे भान ठेवून बाजाराचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेती मालाच्या विक्रीचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच आनंद येईल, असे शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
केळी महामंडळासाठी लवकरच महामंडळाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात केळी उत्पादकांना निर्यातक्षमकेळी पिकविण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.