जळगाव लाईव्ह न्यूज| १ ऑगस्ट २०२३| शहरातील डॉ. संजय पाटील यांची दोघी मुले मुंबईच्या केईएम रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यापैकी मोठा मुलगा डॉ. आदिनाथ संजय पाटील ड्यूटीवर असताना, मृतावस्थेत आढळून आले. डॉ. आदिनाथ यांनी स्वतःच विषारी इन्जेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या या कृत्यामागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आदिनाथ यांची क्षयरोग विभागात ड्यूटी होती. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात फिजिशियन डॉ. संजय व डॉ. स्मिता पाटील यांचे एकवीरा हॉस्पिटल आणि निवास्थान आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ. आदिनाथ पाटील मुंबईतील केईएम रुग्णालयात सहा वर्षांपासून वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहे.सोबत लहान भाऊ अजिंक्य एमबीबीएसचे शिक्षण केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातच घेत आहे. डॉ. आदिनाथ पाटील यांची रविवारी (ता. ३०) क्षयरोग विभागात ड्यूटी होती. नेहमीप्रमाणे नॉर्मल आणि हसतखेळतच ते काम करीत होते.
सोमवारी (ता. ३१) सकाळी आठच्या सुमारास केईएम रुग्णालयातील सफाई कर्मचारी कामावर आले. क्षयरोग विभागाचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडला असता, आत डॉ. आदिनाथ बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारार्थ हलविले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
बेशुद्धावस्थेत आढळलेल्या डॉ. आदिनाथ यांच्या हातावर तीन वेळा इन्जेक्शन टोचल्याचे दिसून येत होते. त्यामुळे इन्जेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती डॉ. आदिनाथ यांच्या कुटुंबीयांना जळगावला कळविण्यात आली. तातडीने आईवडिल मुंबईत दाखल झाले.सायंकाळी पाचला विच्छेदन पूर्ण झाल्यावर मृतदेह त्यांना सोपविण्यात आला असून, ते जळगावकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. वडील डॉ. संजय पाटील, आई डॉ. स्मिता पाटील यांच्या पठडीत तयार झालेला आदिनाथ पाटील अत्यंत हुशार विद्यार्थी होता. इयत्ता बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.त्याने नीट परीक्षेत राज्यातून दुसरा, तर देशातून ८४ वा क्रमांक पटकावला हेाता. केईएम रुग्णालयातही तो हसमुख, मनमिळावू, हुशार, प्रामाणिक विद्यार्थी होता, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे पदव्युत्तर विभागाचे उपअधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी दिली.
डॉ. आदिनाथ यांच्या मृत्यूमुळे केईएमच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना, तसेच पाटील परिवाराला मोठा धक्का बसला आहे. डॉ. आदिनाथ यांच्या मृत्यूमूळे कुटुंबीयांसह परिचित सुन्न झाले असून, त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून, याबाबत भोईवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.