⁠ 
रविवार, मे 19, 2024

चाळीसगावचे गुणवंत सोनवणे यांचा ‘UNO’ मध्ये डंका! राज्यातील जल चळवळीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुभव कथन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| २४ जुलै २०२३। केवळ खानदेशालाच नव्हे, तर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कार्य कळमडू (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी गुणवंत सोनावणे यांनी केले आहे. सध्या ते पुणे येथे संगणक अभियंता आहेत. आपल्या भूजल अभियानाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघामध्ये (UNO) येथे ‘शाश्वत विकासावरील उच्चस्तरीय राजकीय मंच’ या कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात ३९ देशांच्या प्रतिनिधींसमोर गुणवंत सोनवणे यांनी भूजल अभियान या वारकरी संप्रदायाच्या विचारावर सुरू असलेल्या जल चळवळीचे अनुभव कथन केले.

भूजल अभियान या वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारीत असलेल्या जल चळवळीचा अनुभव व कामाचा एकूण प्रवास सांगणारा व्हिडिओ अमेरिकेतील न्युयॉर्कमधील ‘UNO’मध्ये दाखविण्यात आला. भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांनी हा संपूर्ण प्रवास मांडला. १० ते १९ जुलै दरम्यान आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतर्गत पार पडलेल्या या परिषदेत भूजल अभियानाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा व्हिडिओ पाहून उपस्थित विविध देशांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

लोकसहभाग आणि सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू झालेली भूजल अभियान हि एक चळवळ आहे. मुख्यतः नाम फाउंडेशनसह इतरही विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने वारकरी संप्रदायांच्या विचारावर आधारित लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली ही चळवळ आहे. चळवळीच्या चित्रफितीमध्ये सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चळवळीचा प्रवास मांडण्यात आला आहे. याच भूजल अभियानाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील साधारण ४० गावांमध्ये जलसंधारण व जल व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत.

एकंदरीत भूजल अभियानाचे उद्दिष्ट हे गावागावांत जलसाक्षरता निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे व जलसाक्षर भूजल वारकरी निर्माण करणे हे आहे. ही चळवळ खऱ्या अर्थाने भूजल वारकरी व दिंडी प्रमुखांची आहे. लोक प्रत्येक गावातून तसेच चाळीसगाव शहरातून यात कार्यरत असल्याचे गुणवंत सोनवणे यांनी सांगितले आहे.