⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

मुख्यमंत्र्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील ५५६ रुग्णांना जीवनदान; ४ कोटी ६२ लाखांची वैद्यकीय मदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिससह अनेक महागड्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी गोरगरीब-गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने एका वर्षात १०,६४१ गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५५६ रुग्णांना तब्बल ४ कोटी ६२ लाखांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. या कक्षातर्फे महाराष्ट्रातील गोरगरिब रुग्णांना अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉकलिअर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत केली जाते.

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी याबाबतची सविस्तर माहिती आज त्यांच्या फेसबूक पेजच्या माध्यमातून दिली आहे. या माहितीनुसार, खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील ५५६ रुग्णांना ४ कोटी ६२ लाख, धुळे जिल्ह्यातील ९५ रुग्णांना ८९ लाख, नंदुरबार जिल्ह्यातील २९ रुग्णांना ३४ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवून दिले आहे. याशिवाय गत आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गणेश अनिल माळी (वय वर्ष ८) या चिमुकल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात मदत बसत नसल्याने वैय्यक्तिक ५ लाख रुपयांची मदत केली होती.

३६ जिल्ह्यातील १०,६४१ गोरगरीब -गरजू रुग्णांना ८६ कोटी ४९ लाखांचे आर्थिक सहाय्य

मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख, एप्रिल मध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये विक्रमी ९४२ रुग्णांना १४ कोटी ८१ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.