जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । उद्योजक रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल स्मृती सोहळ्यानिमित्त शास्रीय गायक महेश काळे यांच्या गायनाची मैफिल १५ रोजी सायंकाळी ६ वाजता धुळे रोड स्थित फेस्टीवोटल रिसाॕर्ट येथे होत आहे. यासाठी चाळीसगाव पंचक्रोशीतील ३ हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहे. अशी माहिती आ.बं.मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी रविवारी दिली.
यावेळी आ.बं. मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन अॕड. प्रदीप अहिरराव व चाळीसगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर उपस्थित होते. स्व. रमेशचंद्र अग्रवाल हे संपूर्ण देशभर साखर कारखाना व सूतगिरीण्यांची उभारणी करणारे अभियंते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ५० साखर कारखाने तर ३५ सुतरगिरण्यांची उभारणी केली आहे. छत्तीसगड सारख्या अति दूर्गम व नक्षलग्रस्त भागातही त्या राज्यातील पहिला साखर कारखाना त्यांनी उभा करुन दाखवला आहे.
चाळीसगावातही धुळेरोडस्थित औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ त्यांनी केली असून चाळीसगाव एज्युकेश सोसायटीचे ते दिर्घकाळ विश्वस्त होते. याकाळात संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्यासोबत त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम सुरु केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी सोहळा होतो. गेल्यावर्षी गायक अजित कडकडे यांचा कार्यक्रम पार पडला होता. १५ रोजी सोहळ्यास उपस्थितीचे आवाहन गोवर्धनदास मांगीलाल अग्रवाल परिवाराने केले आहे.