⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | “शावैम” मध्ये नातेवाईकांना ऐनवेळी पुरविले पीपीई किट

“शावैम” मध्ये नातेवाईकांना ऐनवेळी पुरविले पीपीई किट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज रविवारी १६ मे पासून नातेवाईकांना आत येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. मात्र सकाळी काही नातेवाईक रुग्णालयात जाण्यासाठी आग्रह करीत होते. अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः: पीपीई किट पुरविले, तसेच काहींचे डबे रुग्णांपर्यंत पोचविण्यासाठी कर्मचारी देखील नियुक्त केले होते.

कोरोना महामारीची दुसरी लाट सुरु आहे. जिल्हाभरात असलेल्या कोविड रुग्णालयांत रुग्णांचे नातेवाईक भेटायला, जेवणाचे डबे द्यायला जातात. मात्र या नातेवाईकांमुळे बाहेर कोरोना संसर्ग पसरण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी १५ रोजी आदेश काढीत कोविड रुग्णालयांमध्ये नातेवाईकांना जाण्यास बंदी केली आहे. तसेच जावयाचे असल्यास पीपीई किट घालून जावे असे आदेश दिले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशापासून वंचित असलेल्या दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनी सकाळी मात्र मुख्य गेट क्रमांक १ समोरच ठिय्या मांडून आत सोडावे म्हणून आग्रह सुरु ठेवला. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील होता. प्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्याशी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी चर्चा करीत तोडगा काढला. आजच्या दिवशी म्हणून नातेवाईकांचे डबे रुग्णांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष ८ कर्मचारी अधिष्ठात्यांनी नेमले. जनसंपर्क कक्षात असलेलया वॉर रूम मार्फत या कर्मचाऱ्यांनी वॉर्डात जाऊन रुग्णांपर्यंत डबे पोचविले. तसेच व्हिडीओ व साधा कॉल करून रुग्णांचे नातेवाईकांशी देखील बोलणे करून दिले.

तसेच ज्या नातेवाईकांना आत जायचे होते, त्यांना रुग्णालयातर्फे पीपीई किट दिले व ते त्यांनी घातल्यावर आत सोडण्यात आले. एकूण १२५ पीपीई किट दुपारी देण्यात आले. यावेळी सुरक्षा समिती अध्यक्ष डॉ. इम्रान पठाण, सदस्य विलास वंजारी, सुरक्षा निरीक्षक अजय जाधव, प्रकाश पाटील, वॉर रूममधील शिवकुमार पडदे यासह कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांची मदत केली. परिस्थीतीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विजय गायकवाड, डॉ. हितेंद्र राऊत, डॉ. चेतन भंगाळे आदी दिवसभर लक्ष ठेऊन होते.

 स्वतंत्र किचन, पूर्ण सुरक्षा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या किचनमधून दाखल सुमारे ३२२ रुग्णांना आयुष मंत्रालयाच्या तक्त्यानुसार सकाळी ८ वाजता नाश्ता, फळे, अंडी दिली जातात. दुपारी १२ वाजता व संध्याकाळी ६.३० वाजता जेवण देण्यास सुरुवात केली जाते. दोन वेळा चहा दिला जातो. या सर्व जेवणाचा दर्जा उत्तम राहण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जेवण रुग्णांना पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णालयाचे किचन व जेवण हे पूर्णपणे सुरक्षित असून नातेवाईकांनी बाहेरून डबा देण्याचा आग्रह करू नये असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

 नागरिकांना आवाहन 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच, डबा देणे, रुग्णाच्या डिस्चार्जसाठी, मृत्यू झाला म्हणून बोलावण्यात आले असेल तर वॉर रूमशी नातेवाईकांनी संपर्क साधावा, पीपीई किट घालूनच यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.