⁠ 
शनिवार, मे 18, 2024

पोलिसांचे आवाहन : चोपड्यात शांतता, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जून २०२३ | चोपड्यात आज दोन गटात वाद होऊन दगडफेकीचा प्रकार घडला होता. घटनेनंतर जिल्ह्यात याबाबत अनेक अफवांना उत आले होते. नुकतेच चोपडा पोलीस निरीक्षकांना याबाबत माहिती दिली असून सध्या गावात शांतता असल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन निरीक्षक के.के.पाटील यांनी केले आहे. गावात योग्य बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांनी म्हटले आहे की, चोपडा शहरातील सर्व शांतता प्रिय नागरिकांना चोपडा शहर पोलिसांच्या वतीने अवाहन करण्यात येते. काही दिवसापुर्वी एका मुस्लिम समाजाच्या मुली सोबत एक भोई समाजाच्या मुलाने लग्न केल्याच्या कारणावरून मुलाचे व मुलीचे नातेवाईक यांच्यामध्ये आज भांडण झालेले आहे. जखमी इसम हा तडीपार असून त्याच्याशी भांडण करणारे इसम हे कुरेशी नसून ते पठाण समुदायाचे आहेत. गॅरेज व मांडे तयार करण्याचे काम ते करतात.

आज झालेल्या घटनेला कोणीही जातीय रंग देऊ नये. दोन कुटुंबातील हे भांडण असून कोणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवा पसरवू नये. भांडण करणारे दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत तसेच इतर आरोपींचा शोध सुरु आहे. जिल्ह्यात सर्वांनी शांतता राखावी आणि कोणीही अफवांना बळी पडू नये. गावात योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला असून सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन निरीक्षक के.के.पाटील यांनी केले आहे.