जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । शहरातील विविध परिसरातून दुचाकी चोरून स्टॅम्प पेपरवर नागरिकांनी खरेदी देत विक्री करणाऱ्या असोदा येथील दोघांच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवानंद लिलाधर भालेराव (वय २२) व समाधान राजू सोनवणे (वय २२, दोघे रा. धनाजीनगर, असोदा) असे त्या संशयितांची नावे आहेत. जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आलेले आहे. हे दोघे संशयित चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनील दामोदरे, विजय पाटील, पंकज शिंदे यांचे पथक असोदा गावी गेले होते. पथकाने दोघा संशयितांबाबत माहिती घेतली. त्यानंतर दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता चोरी केलेल्या ६० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या दुचाकी चोरीला गेल्याबाबत जिल्हापेठ व नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देवानंद व समाधान यांनी दुचाकी विक्रीसाठी प्रतिज्ञापत्र तयार केले होते. त्यावर लिहून देणाऱ्याचे नावही बनावट टाकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दाेघांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाेरीला गेलेल्या तिन्ही दुचाकी दाेघाही भामट्यांकडून जप्त केल्या आहेत. त्या जिल्हापेठ व नशिराबाद पाेलिस ठाणे हद्दीतून चाेरीला गेल्याबाबतची नाेंद झालेली आहे.