जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । कोरोना काळात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली होती. मात्र गेल्या काही काळात खाद्यतेच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. देशातील कोट्यवधी गृहिणींना आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे.
तो म्हणजेच केंद्राने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना निर्देश दिले की, जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या अनुषंगाने येथील प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमती कपात करण्याचे निर्देश दिले आहे.
अन्न सचिवांनी तेल उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली असून मिळालेल्या माहितीनुसार, तेल उत्पादकांनी दरात कपात करण्याचे मान्य केले आहे. केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या अनुषंगाने देशातील प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८ ते १२ रुपयांनी कपात करावी, असे निर्देश दिले.
बैठकीत मंत्रालयाने सांगितले की आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सतत घसरत आहेत आणि म्हणूनच देशांतर्गत बाजारातील किंमती देखील प्रमाणात कमी होतील, हे खाद्यतेल उद्योगाने सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत जागतिक बाजारातील किमतीतील कपात ग्राहकांना त्वरीत पोहोचवण्यासाठी कंपन्यांना सांगण्यात आले आहेत.
जळगावात काय आहे तेलाची किंमत?
सध्या जळगावात किरकोळ एक किलो सोयाबीन तेलाची किंमत 110 ते 112 रुपयापर्यंत आली आहे. तर एक 900ML पाऊस सोयाबीन तेलाची किंमत 100 रुपयाच्या आत आली आहे. हाच दर गेल्या काही महिन्यापूर्वी 150 रुपयावर होता. मात्र त्यात आतापर्यंत मोठी घसरण झालेली दिसून येत असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळत आहे.