सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा झटका ; जळगावात पेट्रोलची शंभरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवस स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डीझेल दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही 90 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.
जळगावात शहरात शुक्रवारी पेट्रोलचा दर हा ९९.८७ एवढा होता. त्यामुळे एक लिटर पेट्रोल घेतल्यावर ग्राहकांना शंभर रुपयेच मोजावे लागत आहेत. देशासह राज्यात आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत.
गेल्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. या काळात जवळपास ९ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. त्यानंतर एप्रिल महिन्यात हे दर कमी व्हायला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या आठवड्यात ३५ पैशांनी दर कमी झाले होते. नंतर पेट्रोलचे दर पुन्हा कमी झाले. ४ मे रोजी ९७.८७ असा पेट्रोलचा दर होता, तर ८७.४८ असा डिझेलचा दर होता. ११ मे रोजी हेच दर थेट ९९.३५ रुपये पेट्रोल आणि ८९.३१ रुपये डिझेल असे पोहोचले आहेत. आता १४ मेला ९९.८७ रुपयांवर पेट्रोल गेले आहे.
४ मे रोजी ९७.८७ हा पेट्रोलचा दर होता. त्यानंतर त्यात वेळोवेळी वाढ होत राहिली आता १४ मे रोजी पेट्रोलचा दर ९९.८७ एवढा झाला आहे. फक्त दहा दिवसांत दोन रुपयांनी पेट्रोल वाढले आहे. सरकारी कंपन्यांच्या पेट्रोलचा हा दर असला तरी खासगी कंपनीच्या पेट्रोलपंपावर ९९.९५ रुपये प्रतिलिटर एवढा पेट्रोलचा दर आहे.