जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : भुसावळ स्थानकावर मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर युपीतील दोघा भामट्यांच्या मुसक्या रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी बांधल्या असून चोरलेले मंगळसूत्र हस्तगत केले आहे.
सावन श्रवन कोहली (29, खानपूर कला, मजरा यहियापूर, केराना, जि.शामली, उत्तरप्रदेश) व राजेश कृष्णकुमार चौहान (28, बिरालीयान, मजरा यहियापूर, झिंझाणा, केराना, जि.शामली, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. दरम्यान, आरोपी सावन कोहली हा कुविख्यात असून त्याच्याविरोधात हरीयाणा राज्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अलिशा सोहन चावेर (27, बेजनबाग, नागपूर) या 20 एप्रिल रोजी 12289 दुरांतो एक्स्प्रेसने मुंबई-नागपूर असा प्रवास बोगी क्रमांक एस- 1 च्या बर्थ 36 वरून करीत असताना भुसावळ आल्यानंतर गाडीत त्यांना झोप लागल्याची संधी आरोपींनी साधत त्यांच्या गळ्यातील 55 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले होते.
दुसर्या घटनेत सीमा चंद्रशेखर सहारे (47, दुर्गापूर, चंद्रपूर) या 20 एप्रिल रोजी देवळाली ते नागपूर असा प्रवास सेवाग्राम एक्स्प्रेसच्या कोच एस- 5 च्या बर्थ क्रमांक 44 प्रवास करीत असताना त्यांच्या गळ्यातील 54 हजारांचे मंगळसूत्र लांबवण्यात आले होते.
ही कारवाई भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक विजय घेर्डे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग उपनिरीक्षक संजय साळुंके, जगदीश ठाकूर, धनराज लुले, अजीत तडवी, दिवाणसिंग राजपूत, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक तर्डे, आरक्षक महेंद्र कुशवाह, विनोद रावल, इम्रान खान आदींच्या पथकाने केली.