जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२३ । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता देशातील नागरिकांना या 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जाऊन बदलता येतील. मात्र अनेकांचा एकच प्रश्न पडत आहे तो म्हणजे एकाच वेळी दोन हजाराच्या नोटा किती बदलता येतील?
आरबीआयने म्हटले आहे की ज्या लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा ते कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन इतर चलनी नोटांसाठी बदलू शकतात.आरबीआयने म्हटले आहे की 2000 रुपयांच्या नोटा बँकेत सामान्य रकमेप्रमाणेच जमा केल्या जाऊ शकतात. याबाबत कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
आरबीआयने म्हटले आहे की बँक शाखांच्या नियमित कामात कोणताही हस्तक्षेप टाळण्यासाठी, 2,000 रुपयांच्या नोटा एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत इतर चलनात बदलल्या जाऊ शकतात. म्हणजेच 2000 रुपयांच्या फक्त 10 नोटा एकावेळी बदलता येतील.
रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार लोकांकडे ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. 2000 च्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये जमा किंवा बदलून घेता येतील. बँकांना स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
बँकांव्यतिरिक्त आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तातडीने देण्यास नकार दिला आहे.