केळी उत्पादक शेततकऱ्यांनो सावधान : ‘या’ रोगाचा झाला आहे शिरकाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । जिल्ह्यात केळीची ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. केळीवर गेल्या काही वर्षांमध्ये कुकंबर मोझॅक व्हायरसचा वेळोवेळी प्रादुर्भाव होत आहे. हा विषाणूजन्य रोग असून, जून ते सप्टेंबर या काळातच या आजाराचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे केळी उत्पादक उपाययोजना करण्याबाबतचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण होते, त्यानंतर पुन्हा कडाक्याचे ऊन पडले. आता २० नंतर पुन्हा पाऊस व ढगाळ वातावरण राहणार आहे. जास्त आर्द्रतेचे हवामान या रोगासाठी पोषक असते.या विषाणूचा प्रादुर्भाव प्रथम रोगट कंदापासून होतो. तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडीच्या माध्यमातून होतो. त्यामुळे शेतकन्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
बागेची २-३ वेळा ४ ते ५ दिवसांनी नियमित निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांची विल्हेवाट लावावी. बागेभोवती असलेले मोठा कणा, धोतरा, काहे रिंगणी, शेंदाड, गाजरी गवत ही तण काढून बाग स्वच्छ ठेवावी. मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० इसी २० मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यू. जी. २ ग्रॅम या कीटकनाशकांची १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.