⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | कृषी | केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा; केळी पिक परिषदेत हे ठराव मंजूर

केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा; केळी पिक परिषदेत हे ठराव मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ | जळगाव जिल्ह्यात सार्वधिक केळीचे उत्पादन घेण्यात येत असले तरी येथील केळी उत्पादक शेतकर्‍यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, गारपीट, बोगस खते, निकृष्ट प्रतिची रोपे, बोगस खते याचबरोबर विमा कंपन्या आणि व्यापार्‍यांनी चालवलेली शेतकर्‍यांची पिळवणूक आदी संकटांमधून शेतकर्‍यांना मार्ग काढावा लागतो. याच समस्यांवर चर्चा करण्यासाठी पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद आज जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे पार पडली.

महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं आयोजित या परिषदेत केळी उत्पादकांच्या संदर्भात विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये केळीला प्रतिकिलो १८ रुपये ९० पैसे हमीभाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसह केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा अशी मागणी करण्यात आली. केळी उत्पादक शेतकर्‍यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या सर्व मुद्यांवर या परिषदेत चर्चा झाली. केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकर्‍यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावरही परिषदेत चर्चा झाली.

केळी पिक परिषदेत करण्यात आलेले ठराव
१) केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्यात यावा.
२) केळीला १८ रुपये ९० पैसे असा हमीभाव मिळावा.
३) विमा कंपन्यांची मनमानी थांबूवून शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा.
४) प्रतिबंधित असणारी औषधे, तसेच खते यापुढे कुठल्याही कृषी केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवल्यास कृषी अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल.
५) भाव न मिळाल्यास केळी उत्पादक संघ रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन करणार.

या शेतकर्‍यांचा केळीरत्न पुरस्कारानं सन्मान
ज्या शेतकर्‍यांनी एकरी केळीचे ३० टनापेक्षा अधिक उत्पादन घेतलं आहे, त्या १९ शेतकर्‍यांना केळीरत्न पुरस्कार देण्यात आला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकरी कपिल जाचक, गणेश कदम (पंढरपूर), किशोर राणे (यावल जळगाव), यश नराजे (तेल्हारा अकोला), विजय कोकरे (करमाळा), सुमण रणदिवे (पंढरपूर), धिरज पाटील (सोयगाव, संभाजीनगर), अभिजीत पाटील (करमाळा), शिवशंकर कोरडे (तेल्हारा अकोला), नागेश चोपडे (अंदापूर), लक्ष्मण सावळे (रावेर), दत्तात्रय सजे (अहमदनगर), कन्हैय्या महाजन (रावेर), अतुल जावळे (यावल जळगाव), विजय पाटील (जळगाव), उत्तम पाटील (जळगाव)भालचंद्र पाटील (जळगाव), दिनेश आढाव (संग्रामपूर बुलढाणा), माणिक पाटील (जळगाव) यांचा सन्मान करण्यात आला.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.