जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । सातबारा उताऱ्यावर वारसांचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यास दीड हजाराची लाच स्वीकारणाऱ्या तलाठीसह महिला कोतवाल जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळयात अडकले आहे. दोघांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याच्या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील रहिवाशी असून त्यांच्याकडे वडीलोपार्जीत जमीन आहे. या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वारसांची नावे लावण्यासाठी संशयित आरोपी तलाठी सलीम अकबर तडवी (वय-४४) रा.भडगाव याने सुरूवातीला १ हजार रूपयांची लाच घेतली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांच्याकडे १ हजार ५०० रूपयांची मागणी महिला कोतवाल यांनी सोबत केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाचे आज शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसुलच्या गोटात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.