जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घटना वाढतच आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आता तर चक्क तरुणाच्या डोळ्यासमोरून दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील निवृत्तीनगरात काल मंगळवारी साडेआठ वाजता तरुण घराच्या गच्चीवर बोलत असतांना, त्याच्या डोळ्यादेखत दोघा चोरट्यांनी अंगणात उभी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आज बुधवारी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निवृत्ती नगरात निलेश दत्तात्रय पाटील वय ३१ हा कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो खाजगी नोकरी करत असून त्याच्याकडे एम.एच.१९ बी.ई.८९५० या क्रमांकाची दुचाकी आहे.
काल मंगळवारी निलेशनेही दुचाकी नेहमीप्रमाणे अंगणात उभी केली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निलेश घराच्या गच्चीवर बोलत उभा होता. यादरम्यान दोन चोरटे आले. त्यांनी डोळ्यादेखत अंगणात उभी दुचाकी सुरु केली. सुरुवातीला मित्र दुचाकी घेवून जात असल्याचे निलेशला वाटले, मात्र यानंतर निलेशने गच्चीवर पाहिले असता, त्याचे मित्र नव्हते, कुणीतरी अज्ञात दोन व्यक्ती आपली दुचाकी घेवून जात असल्याची खात्री झाल्यावर निलेशने आरडाओरड केला व चोरट्यांचा बजरंग बोगद्यापर्यंत पाठलाग केला. मात्र चोरटे हाती लागले नाही. आज बुधवारी दुपारी निलेश पाटील याने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून त्याची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यावरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर सपकाळे हे करीत आहेत.