⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | कृषी | आधीच ८० टक्के कापूस घरात पडून, आता हे नवं संकट…

आधीच ८० टक्के कापूस घरात पडून, आता हे नवं संकट…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १४ मार्च २०२३ : सध्या कापसाला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. हा भाव १० हजार रुपये प्रति क्विंटल होईल, या अपेक्षेने गेल्या काही महिन्यांपासून शेतकर्‍यांचा कापूस घरातच पडून आहे. व्यापार्‍यांच्या अंदाजानुसार शेतकर्‍यांनी केवळ २० टक्के कापसाची विक्री केली असून अजूनही ८० टक्के कापूस घरातच आहे. पडून-पडून हा कापूस पिवळा पडायला लागला आहे. त्यातच आता ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकर्‍यांपुढे नवं संकट उभं राहिलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने ५ ते ७ मार्चदरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता १३ ते १७ मार्चदरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे. दि.१४ रोजी जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, दादर ही पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यांत झाले. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधित झाली होती. १३ हजार ३५४ शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहू, मका, ज्वारी, सूर्यफूल, कांदासह केळी, पपई, मोसंबी, लिंबूचा समावेश होता. आता पुन्हा अवकाळीचे संकट असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पिकं खराब होण्याआधीच शेतकर्‍यांनी कापणी करुन घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.