जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । मागील गेल्या काही दिवसात राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. सोबतच काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हवामान विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या मते 14 मार्चपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान खराब होईल आणि अवकाळी पावसासह गारपीट होईल, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात ४ मार्चपासून ते ९ मार्च पर्यंत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. यादरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला.
अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने, गहू, हरभरा, कांदे तसेच फळ पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, पपई केळी यांसारख्या पिकांची मोठी हानी झाली.
शेतकरी या नुकसानीतून अद्यापही सावरले नसून त्यातच आता राज्यात 14 मार्चपासून विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. नागपूर हवामान विभागाने विदर्भात 14 ते 17 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज बांधला आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात या कालावधीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत निश्चितच भर पडणार आहे.
रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांपासून हिरावून घेतला असल्याचे चित्र असतानाच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे.