जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ | जळगाव रुग्णालयाच्या औषध व साहित्य खरेदीत ४५ कोटींचा गैरव्यावहार झाला असून त्याची चौकशीच होत नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत केला. जळगाव जिल्हा रुग्णालयासाठी औषधे व सर्जीकल साहित्याची खरेदी झाली, त्यात ४५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते. त्या सर्व वस्तू विनावापर पडून आहेत. त्याची चौकशीही होत नाही, असे खडसे म्हणाले.
राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाच्या रुग्णालयांना लागणारी औषधे व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याचे विधेयकावर आज विधान परिषदेत चर्चा सुरु होती. यावेळी एकनाथ खडसे यांनी जळगावच्या वैद्यकीय उपकरणे व औषध खरेदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. खडसेंच्या या आरोपांनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी खडसे – महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी देखील झाली.
खडसे-महाजन खडाजंगीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील खडसेंच्या आरोपांचे खंडण केले. यावर बोलतांना खडसे म्हणाले की, रेकॉर्ड तपासून पहा. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. एकनाथ शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्याची तक्रार केली आहे. विविध यंत्रणांना भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या. त्याची एक प्रत मला देखील दिली आहे, असे सांगत ४५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आहे, याचा पुनरूच्चार केला.
…तर जळगावच्या विषयावर विशेष अधिवेशन बोलवावे लागेल
खडसे-महाजन-गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक वाद पेटला असतांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांना थांबवत आपण विधेयकाच्या गुणवत्तेवर बोलावे. विषयाला फाटे फोडू नये, असे सांगितले. त्यावर खडसे यांनी ठामपणे मी त्यावरच बोलत आहे. विधेयकाचा विषय देखील तोच आहे. त्यात भ्रष्टाचाराच संबंध येतो, असे सांगितले. त्यानंतरही वाद-विवाद सुरुच होता. ना. पाटील यांनी उपरोधीकपणे जळगावच्या विषयावर विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. त्यात जळगावचेच सदस्य बोलतील, असे सांगितले.