⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महावितरणच्या ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

महावितरणच्या ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव/धुळे/नंदुरबार : गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या ३५ हजार ६०० (४७ टक्के) नियमित व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी स्थानिक जिल्हा व पालिका प्रशासनासोबत समन्वय साधावा व लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सद्यस्थितीत प्रामुख्याने घरूनच काम सुरू असल्याने घरगुतीसह कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे कर्मचारी बाधीत होण्याच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महावितरणच्या ७५ हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ६०० (४७ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे ६ हजार ५६२ कर्मचारी कोरोनाबाधीत झाले असून त्यापैकी ४ हजार १३२ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या २ हजार २२१ कर्मचारी कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर रुग्णालय व घरी उपचार सुरु आहेत.

ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सुध्दा वरिष्ठ पातळीवर कोरोना व लसीकरणासंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांची महावितरणकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे दर आठवड्याला क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनासंदर्भात आढावा घेत आहेत. श्री. सिंघल यांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा नुकताच संवाद साधला व चर्चा केली. कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस त्वरित  उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी श्री. सिंघल यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुख्यालयाकडून कोविड संबंधीत सर्व शासकीय यंत्रणांकडे युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु आहे.

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडल कार्यालयांमध्ये समन्वय कक्ष कार्यान्वित झाले आहेत. या कक्षांद्वारे कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना, कुटुंबियांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या, कुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थाने तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. तसेच कोरोना व लसीकरणाबाबत परिमंडल स्तरावर दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली वीजसेवा देण्यासाठी महावितरणचे सर्व कर्मचारी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहे. राज्यातील २ कोटी ८० लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार बाजूला ठेवून युद्धपातळीवर कामे करण्यात येत आहे. राज्यात सद्यस्थितीत अतिरिक्त १० ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांसह ३९ कोविड रुग्णालयांना २४ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.

जळगावात मंगळवारी २१० जणांचे लसीकरण

कोरोना संकटात ग्राहकांना अहोरात्र अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी धडपडणाऱ्या जळगाव परिमंडलातील महावितरणच्या १८ वर्ष वयोगटावरिल कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी आयोजित शिबिरात २१० कर्मचाऱ्यांनी लस घेतली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशाने मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या पुढाकाराने व  जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण यांच्या सहकार्याने महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्रात हे शिबीर झाले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता नरेंद्र चौधरी, प्रदीप सोरटे, उपकार्यकारी अभियंता पराग चौधरी, अजय वाणी, व्यवस्थापक उद्धव कडवे यांच्यासह विजय सोनवणे व विविध संघटनांचे प्रतिनिधी  उपस्थित होते. लसीकरणासाठी डॉ.सुहास बडगुजर, परिचारिका संगीता साबळे, प्रदीप पाटील, वानखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.