जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२३ । जळगावातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) लवकरच मोठी भरती होण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिका स्थापनेला येत्या मार्च महिन्यात २० वर्षे पूर्ण हाेत असून नगरपालिका असताना राज्य शासनाने वेळाेवेळी काढलेल्या आदेशानुसार रिक्त पदांवर भरती करण्यात आली हाेती. त्यातच महापालिका स्थापनेनंतर प्रथमच मनपाचा २१५७ पदांच्या आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली.
त्यात ८४२ पदे व्यपगत करताना ३३६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मनपातील रिक्त ६५० पदांवर भरती करता येणार आहे.मनपाच्या स्थापनेपासून आजपर्यंत १०१ पदांची भरती व अनुकंपा नियुक्ती वगळता काेणतीही भरती झालेली नाही. त्यामुळे गेल्या २० वर्षांत सुमारे ११०० कर्मचारी महापालिकेच्या सेवानिवृत्त झालेले आहेत.
सध्या १५५० कर्मचारी मनपात कार्यरत आहेत. महापालिकेच्या विविध विभागांवर कमी कर्मचारी असल्याने ताण वाढला आहे. मात्र आता नवीन आकृतिबंध मंजूर झाल्याने नवीन कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न सुटणार आहे.
मनपाकडे २५६१ पदांचीच माहिती
मनपाने राज्य शासनाकडे आकृतिबंध मंजुरीसाठी १ नाेव्हेंबर २०२१ व १५ सप्टेंबर २०२२ राेजी प्रस्ताव सादर केले हाेते. त्यानुसार शासनाने मंजूर २६६३ पदांच्या नियुक्तीचे आदेश मागवले हाेते; परंतु मनपा केवळ २५६१ पदांचेच आदेश सादर करू शकली. तर १०२ पदांच्या आदेशाची काेणतीही माहिती मनपात उपलब्ध नाही. दरम्यान, आकृतिबंध मंजूर करताना राज्य शासनाने २६६३ पैकी ८४२ पदे व्यपगत केली आहेत. यात वर्ग एकचे एक, वर्ग दाेनची तीन पदे, वर्ग ३ची ३२२ पदे तर वर्ग चारची ५१६ पदे व्यपगत केली असल्याचे या आकृतिबंधातून प्रकर्षाने समाेर आले आहे.
३९ विभागांसाठी ३३६ पदांची निर्मिती
महापालिकेत आवश्यक नसलेली पदे रद्द करताना शासनाने नवीन पदांची निर्मिती करताना काही पदांची नावे बदलली आहेत. मनपातील विविध ३९ विभागांत १८२१ मंजूर पदे असून ३३६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यात अतिरिक्त आयुक्त हे पद प्रतिनियुक्तीवर असेल. याशिवाय प्रभाग कार्यालयांत ६७ नवीन पदे तयार हाेतील. ई-प्रशासन विभागासाठी प्रथमच दाेन पदांची निर्मिती करण्यात आली आहे.