बीएचआर खंडणी प्रकरण : अॅड.चव्हाण यांच्या वकिलांचा अडीच तास युक्तिवाद, सोनाळकरांची उपस्थिती
जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२३ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (BHR) प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे व्यापारी उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्ह्यात अॅड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून सरकार पक्षातर्फे तपास पथकाच्या अहवालाआधारे त्याला जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. शुक्रवारी याप्रकरणी कामकाज झाले असता अॅड.प्रवीण चव्हाण यांच्यातर्फे वकिलांनी अडीच तास युक्तिवाद करीत बाजू मांडली.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (BHR) प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावचे उदय पवार यांच्याविरुद्ध सूरज सुनील झंवर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पुण्यात दाखल या गुन्ह्याचे ठिकाण चाळीगाव असल्याने गुन्हा चाळीसगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी विशेष पथक गठीत एसआयटी गठित केली आहे.
गेल्या काही दिवसात विशेष तपास पथकाकडून काही तपास करण्यात आला असून त्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा सरकारी वकिल अॅड.सुरेंद्र काबरा यांना अहवाल दिला होता. अॅड.काबरा यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना काही मुद्द्यांच्या आधारे जामिनासाठी जोरदार आक्षेप घेतला होता. शुक्रवारी न्या.मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता अॅड.चव्हाण यांच्या बाजूने अॅड.गोपाळ जळमकर यांनी बाजू मांडली. गुन्ह्यातील सर्व मुद्दे आणि काही तांत्रिक मुद्दे देखील स्पष्ट केले. गुन्ह्यात अॅड.चव्हाण यांचा कुठेही प्रत्यक्ष संबंध नसून सर्व काही उदय पवार यांच्याशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी न्यायालयात संशयीत शेखर सोनाळकर हे देखील उपस्थित होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे ते व्हील चेअरने आले होते. आज अॅड.जळमकर यांनी अडीच तास युक्तिवाद करीत सर्व मुद्दे मांडले.
याप्रकरणी पुढील कामकाज सोमवारी होणार आहे. सोमवारी फिर्यादी सूरज झंवर यांच्यातर्फे त्यांचे वकील देखील बाजू मांडण्याची शक्यता आहे. उदय पवार अद्याप फरार असून त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेले नाही.