जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । येत्या १४ मे रोजी अक्षय तृतीया व ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील दुकाने सुरु ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. तसेच सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. येत्या शुक्रवारी ( दि.१४ ) रमजान ईद सोबत अक्षय तृतीयेचा पवित्र सण आहे. यामुळे नागरिकांना सणासाठी विविध वस्तू खरेदी करावयाच्या असतात. मात्र सद्यस्थितीत फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु आहेत.
या संदर्भात भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष शफी पहेलवान व नगरसेवक मुन्ना तेली यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे सणानिमित्त दुकाने उघडण्याची मागणी केली असता खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या दि.११ मे पासून ते १४ मे पर्यंत सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुकामेवा, कापड व इतर साहित्याची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.
तसेच मुक्ताईनगर येथील उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांच्या निवेदनानुसार अक्षय तृतीया व ईदनिमित्त आवश्यक असलेली दुकाने सुरु ठेवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.