⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | सावधान! जळगावमध्ये प्लॉट, जमीन परस्पर विकणार्‍यांचे रॅकेट

सावधान! जळगावमध्ये प्लॉट, जमीन परस्पर विकणार्‍यांचे रॅकेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२३ । जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी हिवाळी अधिवेशनात जळगावात भूखंडांचे श्रीखंड लाटणार्‍यांचे रॅकेट असल्याचा गौप्यस्फोट केला होता. लक्षवेधीच्या माध्यमातून या रॅकेटची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोच, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर आवश्यक दस्तऐवज बनावट तयार करून जळगावच्या एका डॉक्टरांच्या कोट्यवधी रुपयांचे तीन प्लॉटची परस्पर खरेदी-विक्री व्यवहार करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

अयोध्यानगरात सर्वे क्रमांक १४० मधील प्लॉट नंबर ३३, ३४ आणि ३५ हा बखळ प्लॉट डॉ. अनिता राजेंद्र नेहते यांच्या मालकीचा आहे. त्या बाहेरगावी राहतात. त्यांच्या मालकीचे तिन्ही प्लॉट परस्पर नावावर लावून ते विकून प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा मलिदा लाटण्याचा घाट शहरातील एका टोळीने रचला होता. या टोळीने डॉ. अनिता नेहते यांच्या वयाची गंगाबाई नारायण जाधव (वय ४२) हिचे बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड अनिता नेहते या नावाने तयार केले. ते आधार व पॅनकार्ड व इतर कागदपत्रांची जुळवणी करून त्या महिलेला उपनिबंधक कार्यालयात उभे करून व्यवहार झाल्याचे दाखविण्यात येणार होते. या बनावट व्यवहाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून राजू जगदेव बोबडे (वय ४२, रा. विटनेर, ता. जळगाव), प्रमोद वसंत पाटील (वय ४६, विरावली, ता. यावल), गंगा नारायण जाधव (वय ४२, आयोध्यानगर, जळगाव) या तिघांना ताब्यात घेतले.

अशी केली जाते फसवणूक
शहरातील पडकी घरे, प्रॉपर्टीचे वाद सुरू असलेली कुटुंब, शहरात रिकामी घरे, बंगले, खुले भूखंड असून दुसर्‍या शहरांमध्ये राहणारे नागरिक यांची संपूर्ण माहिती रॅकेटतर्फे गोळा केली जाते. या शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे तयार केली जातात. गरजवंताचा शोध घेतल्यानंतर त्याच्या मालमत्तेचे खरेदीखत तयार करुन ठेवले जाते. मालकाच्या नकळतपणे काही प्रमाणात प्रक्रिया पूर्णही केली जाते. यामुळे नागरिकांनी आपल्या मालमत्तांची संपूर्ण माहिती ठेवत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.