जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । गेल्या पंधरवाड्यापासून असलेले ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शहरात देखील रात्री वारा सुरू होता मात्र दिवसभर तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसच्या उच्चांकी पातळीवर असल्याने ढगाळ वातावरणात देखील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.
येत्या चार दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील वातावरण काेरडे राहणार असून विदर्भ, काेकणावर पुर्व माैसमी पावसाचे सावट राहणार असल्याचा अंदाज भारत माैसम विभागाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशापासून तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रामार्गे कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
परिणामी राज्यात पुर्वमौसमी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बीड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावल्यास अगोदरच मेटाकुटीला आलेला बळीराजा आणखीच रडकुंडीला येईल. उकाड्याने दिवसभर अंगाची लाहीलाही होत असून नागरिक बाहेर जाणे टाळत आहे.