जळगाव लाईव्ह न्यूज | २५ जानेवारी २०२३ | आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. यानिमित्ताने सर्वत्र देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या खान्देशचे (Khandesh) योगदान काय राहिले आहे? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. हे वाचल्यावर तुम्हाला खान्देशी असण्याचा केवळ अभिमानच वाटणार नाही तर गर्व वाटेल…स्वातंत्र्य लढ्यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे योगदान खूप मोठे राहिले आहे. जळगाव जिल्ह्यातून एक हजाराच्यावर स्वातंत्र्य सैनिकांव्यतिरिक्त शेकडो पुरुष व महिलांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी हातभार लावला.
वासूदेवराव तथा अण्णासाहेब दस्ताने, देवकीनंदन नारायण, धनाजी नाना चौधरी, मीर शुक्रुल्लाह, साने गुरुजी, सुकभाऊ चौधरी, हरिभाऊ चव्हाण, सोनू सावळू खत्री, व्यंकटेश मोडक, बा.र.देशपांडे, शंकर काबरे, सीताराम बिर्ला, ना.मा.गोखले, अशी कितीतरी नावे यात घेता येतील. सन १९३६ साली फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. यावरुन जळगाव जिल्ह्याचा किंवा खान्देशचा स्वातंत्र्य लढ्यात किती महत्त्वाचा वाटा होता, हे अधोरेखीत होते.
पुर्व खान्देशात धनाजी नाना चौधरी यांचा प्रभाव राहिला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील खिरोदा या गावातील धनाजी नाना चौधरी यांनी १६ जून १९३० रोजी पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा देऊन ते राष्ट्रीय कार्यात उतरले. ही घटना जिल्ह्याच्या इतीहासात अत्यंत महत्वाची मानावी लागेल. धनाजी नाना चौधरी यांच्यामुळे खिरोदा हे गाव स्वातंत्र्य चळवळीचे मोठे केंद्र झाले होते. त्यांनी स्थापन केलेली जनता शिक्षण मंडळ ही संस्था स्वातंत्र्य सैनिकांचे मदत केंद्र झाली होती. भारत छोडोमध्ये संपूर्ण खिरोदा गाव सहभागी होते. काहींना शिक्षा झाल्या, काही भुमिगत झाले, काही अल्पवयीन म्हणून सोडून दिले. भारत छोडो ठराव संमत झाल्यानंतर ९ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींना अटक झाल्याचे वृत्त पसरताच त्या दिवशी जळगाव, भुसावळ व चाळीसगाव येथे प्रचंड जनक्षोप पसरला. त्याच दिवशी धनाजी नाना यांना अटक करण्यात आल्याने त्यांच्या अनुयायांच्या संतापात अजूनच भर पडली. हजारो लोक रस्त्यावर उतरले. याच दिवशी अजून एक मोठी घटना घडली. साने गुरुजी ९ ऑगस्टला रात्री धुळे कारागृहातून मुक्त झाल्यावर ते गुप्तपणे अमळनेरला आले व भुमिगत झाले. त्यांनी डॉ.उत्तमराव पाटील (डांगरीचे) यांना गोपनीय संदेश पाठवून पुढचा लढा कसा सुरु ठेवायचा? याच्या सुचना देत पुणे गाठले.
आडगाव व एरंडोल या दोन गावांचे मोलाचे योगदान
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आडगाव व एरंडोल या दोन गावांचे मोलाचे योगदान राहिले आहे. दोन्ही गावे मिळून सुमारे ७० ते ८० स्वातंत्र्यसैनिकांची शासन दप्तरी नोंद झालेली होती. १९४२ च्या लढ्यात स्वातंत्र्यसेनानी ब्रिटिशांच्या बंदुका मोडल्या होत्या. ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात भगवान भुसारी, शामराव पाटील, त्र्यंबक वाणी हे हतात्मा झाले. या ठिकाणी ब्रिटिशांनी गोळीबार केला. तेथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. जंगल सत्याग्रहामध्ये शहादू चौधरी, नारायण मुसांदे, कौतिक पाटील, सका पुणेकर, बाजीराव पाटील, बुधा महाजन, दशरथ महाजन, हरी पाटील, नामदेव पवार, अमृत वनवे, रामदास कोळी, धनराज पांडे यांनी भाग घेतला. यापैकी आठ सत्याग्रहींना कारावासाची शिक्षा झाली होती.
खान्देशातील आदिवासी बांधवांचा लढा
खान्देशात स्वातंत्र्यलढ्याचा पाया कुणी रचला? यावर इतीहास संशोधकांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र सर्वांचे एका गोष्टीवर एकमत होते. ते म्हणजे, ब्रिटिशांना सर्वात आधी विरोध केला तो खान्देशातील आदिवासी बांधवांनी! इतीहासातील नोंदी नुसार, खान्देश जिंकण्यासाठी ब्रिटिशांनी १८१७ मध्ये सुरु केलेली लढाई संपण्यासाठी १८२० साल उजाडले. पाचोरा, पारोळा, यावल, भडगाव, एरंडोल, डांग, नंदुरबार, सुलतानपुर येथे संघर्ष करावा लागला. लोकमान्य टिळकांनी १८९६ मध्ये शेतसारा बंदी मोहिम सुरु केली त्यास खान्देशात प्रचंड प्रतिसाद मिळाला. एरंडोल, अमळनेर, धुळे येथे मोठी चळवळ उभी राहिली. त्यानंतर गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनालाही जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, चडार्डी, आसोदा, नशिराबाद, यावल, रावेर, किनगाव या सारख्या लहान लहान गावांमधूनही सक्रिय सहभाग मिळाला. १९२७ साली महाराष्ट्र दौर्यात गांधीजींनी चाळीसगाव, जळगाव व भुसावळ येथे भेट दिल्याची नोंद आढळते.
भुसावळ बॉम्ब खटला
उत्तर भारतात पोलिसांनी व्यापक जाळे पसरल्यामुळे क्रांतीकारकांचे ग्वाल्हेरचे भुमिगत बॉम्ब निर्माण केंद्र असुरक्षित झाले. म्हणून बॉम्ब केंद्र अकोला येथे हलवण्याचा विचार चंद्रशेखर आझाद यांनी केला. तेव्हा शिवराम हरी राजगुरू अकोल्यात होते. आझादांच्या सुचनेनुसार मलकापूरकर आणि माहौर ग्वाल्हेर केंद्रातील बॉम्ब निर्मितीची साधनसामग्री दोन जिवंत बॉम्ब, काडतुसे, आणि स्फोटक रसायने घेऊन अकोला येथे राजगुरू कडे निघाले. प्रथम झाशीला जाऊन विश्वनाथ गंगाधर वैशंपायन यांचेकडे जाऊन लागणारी सामग्री घेऊन रेल्वेने भुसावळ येथे आले. गाडी बदलून अकोला येथे जाण्यासाठी भुसावळ येथील फलाटावर उतरवल्या मुळे सीमा शुल्क विभागाच्या तपासनीसाला शंका आली आणि हमालाजवळील मोठी जड ट्रंक तपासायला सुरुवात केली.
भगवानदास यांनी कुशलतेने भरलेले पिस्तूल खिशात घातले पण ट्रंकमधील काडतुसाचे पुडके खाली पडले आणि त्यांनी शिटी फुंकून पोलीसांना बोलवले. गुप्त सामानाची ट्रंक उचलून रेल्वे लाईन वर पळतांना मलकापूरकरांचा पाय सिग्नलच्या वायरमध्ये अडकला आणि ते खाली पडले. खिशातील पिस्तुलाने गोळ्या झाडत निसटण्याचा प्रयत्न करत भगवान दासराव यांचा उद्देश असफल झाला आणि ते पकडले गेले. ११ सप्टेंबर १९२९ रोजी चंद्रशेखर आझाद यांचे साथीदार पकडले गेले. दोघांवर जळगाव सत्र न्यायालयात राजद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला. त्यांचे दोन साथीदार जयगोपाळ आणि फणिंद्र घोष त्यांना लाहोर बॉम्ब प्रकरण आणि पंजाब कटातील गुन्हेगार असल्याचे सिध्द करण्यासाठी माफीचे साक्षीदार म्हणून सरकारच्या मदतीला धावून आले. ही बातमी दोघांना म्हणजे मलकापूरकर आणि माहौल यांना कळताच त्यांनी धुळे कारागृहात या देशद्रोही दोघांचा वध करण्यासाठी निर्धार केला.
खटल्यासाठी जळगावात आणल्यावर घरून डबा मागवण्याची परवानगी मागितली आणि सदाशिव मलकापूर कर यांचे ज्येष्ठ बंधू शंकरराव यांनी जेवणाच्या डब्यातून भरलेले पिस्तूल पुरवले. भगवान दास यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या पण वर्मी न लागल्याने ते फक्त जखमी झाले आणि पिस्तुल पुरवले म्हणून देवकीनंदन आणि दहा खानदेशातील जणांवर घटला भरण्यात आला. पिस्तूल कुणी पुरवले याचा पत्ता लागला नाही मात्र १९८६ मध्ये एका जाहिर सभेत शंकरराव यांनी आपणच पिस्तूल पुरवल्याचा गौप्यस्फोट केला. मलकापूर कर आणि माहौर यांना पंधरा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला गेला. सक्कर आणि नंतर अहमदाबाद कारागृहात ठेवण्यात आले होते.
नंदुरबार जिल्ह्यात जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे इंग्रजांनी २ मार्च १९४३ रोजी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती. या घटनेत आपल्या आदिवासी बांधवातील जवळपास पंधरा ते वीस लोक शहीद आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. इतीहासातील नोंदींनुसार, १९४३ साली ‘चलेजाव चळवळीने’ इंग्रज राजवटीला जेरीस आणले होते. याच चलेजाव चळवळी मध्ये खानदेशातील आदिवासी बांधवांनी मोलाचे योगदान दिले आहे. चलेजाव चळवळीत सक्रिय योगदानासाठी ‘आप धर्माचे’ प्रमुख ‘संत रामदास महाराज’ यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना ४ मार्च १९४३ रोजी महाशिवरात्रीला आरती व पूजनाच्या कार्यक्रमाला हजर राहून चळवळीस पाठिंबा देण्याचे व सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले होते. महाशिवरात्रीच्या या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करीत असताना २ मार्च १९४३ रोजी हजारो आदिवासी बांधव निझरा नदीपात्रात जमले होते. यावेळी ब्रिटिश सरकारने रावलापाणी जवळील निझरा नदी पात्रात जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांवर अमानुष पद्धतीने गोळीबार केला. यात जवळपास पंधरा ते वीस आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. गोळीबार होणार याची पूर्वकल्पना संत रामदास महाराज यांनी सर्व भक्तजनांना दिली होती. तरीही आप धर्माच्या अनुयायांनी न डगमगता, न घाबरता पुढे निघाल्याची नोंद आहे.
खान्देशातील २६ महिला स्वातंत्र्य सैनिकांना कारावास
स्वातंत्र्यलढ्यात पश्चिम खान्देश अर्थात धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. ब्रिटिशांच्या विरोधात पेटून उठलेल्या क्रांतिकारकांमध्ये जिल्ह्यातील २६ महिला स्वातंत्र्यसैनिकांनी कारावास भोगला होता. राज्य शासनाने १९७९ मध्ये प्रकाशित केलेल्या चरित्र कोशात जिल्ह्यातील महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्याची नोंद करण्यात आली आहे. जंगल सत्याग्रहात पुढाकार धुळ्यातील नर्मदाबाई मुरलीधर भावसार यांनी जंगल सत्याग्रहासाठी ९ महिने शिक्षा भोगली होती. हंसाबाई रूपला रोकडे यांनी चळवळीतील सहभागासाठी शिक्षा भोगली होती. सुंदरबाई मनुबाई भावसार, रमाबाई गोपाळ मदाने, सरस्वतीबाई केशव मानेकर, सरलाबाई वासुदेव मुधोळकर, वारूबाई शिंपी या महिला स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. ‘चले जाव’मध्ये सहभाग कमलाबाई अष्टपुत्रे यांनी इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्या चलेजाव चळवळीत सहभागी झाल्या होत्या. त्यांना ११ महिने शिक्षा झाली होती.
सवाई मुकटी येथील लक्ष्मीबाई विष्णू उपाध्ये यांनी कायदेभंग चळवळीत सहभाग नोंदवला होता. त्यांना तीन महिने कारावास झाला होता. नंदुरबार येथील ताराबेन घनश्यामदास गुजराथी यांना सत्याग्रहासाठी तीन महिने कैद झाली होती. खजिना लुटीतही पुढे धुळे बोरकुंड येथील चंद्रभागा श्रावण पाटील यांनी खजिना लुटीत सहभाग नोंदवला होता. त्या चले जाव चळवळीतही सहभागी होत्या. छडवेल पखरूण येथील नादरबाई कौतिक पाटील, सवाई मुकटी येथील शारदाबाई पाटील, सारजाबाई पाटील, अक्कलकुवा येथील सावित्रीबाई पाटील, धुळ्यातील पार्वतीबाई ठकार, विटाई येथील जनाबाई पवार, डांगुर्णे येथील मनुबाई गोसावी, शेवंताबाई गोसावी, सीताबाई गोसावी, कापडणे राधाबाई गोसावी, सुंदरबाई विनायक पाटील, कमलबाई जोशी यांनी कायदेभंग, चले जाव चळवळीत सहभाग नोंदवला होता.