⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता : बनावट मेसेजना बळी न पडण्याचे आवाहन

ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता : बनावट मेसेजना बळी न पडण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ जानेवारी २०२३ | महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

ते म्हणाले की, बनावट संदेश पाठवून खासगी व सार्वजनिक वीज कंपन्यांच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आहेत. फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महावितरण नियमितपणे ग्राहकांना जागृत करण्यासाठी विविध माध्यमातून माहिती देत असते. ग्राहकांनी त्याची नोंद घ्यावी तसेच इतरांनाही सावध करावे.

बनावट संदेशाद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याबाबत महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे तसेच महावितरणच्या ॲपवर माहिती दिली आहे. महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो त्यामध्ये मेसेज पाठविणाऱ्याचा नावात स्पष्टपणे एमएसईडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉट्स ॲप संदेश पाठवत नाही. महावितरणची बिले ऑनलाईन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर सुविधा असून लाखो ग्राहक तिचा वापर करत आहेत. पण महावितरण बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकाऱ्यास संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण कोणालाही फोनवरून ओटीपी विचारत नाही.

सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ताबा घेता येईल असे एनीडेस्क किंवा तत्सम ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात आणि फसवणूक करतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर केला नाही तर फसवणूक रोखण्यास मदत होईल.

ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडीत करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे. ताबडतोब बिल भरा नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू असे धमक्या दिल्यासारखे संदेश महावितरण कधीही पाठवत नाही.

महावितरणचे तक्रार नोंदविण्याचे टोल फ्री क्रमांक 1800-233-3435 तसेच 1800-212-3435 असा अकरा आकडी वेगळे क्रमांक आहेत. त्यावर मोफत फोन करता येतो. महावितरण कधीही ग्राहकांना एखाद्या व्यक्तीच्या खासगी मोबाईल क्रमांकावर फोन करण्यास सांगत नाही.

आर्थिक फसवणुकीच्या हेतूने वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनाला आल्यापासून महावितरणने त्याविरोधात कारवाईसाठी एक वर्षापेक्षा अधिक काळापासून अनेक पावले उचलली आहेत.

महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कंपनीच्या मुख्य कार्यालयाने तसेच प्रादेशिक कार्यालयांनी राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टलवर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तक्रार नोंदविली होती. तसेच मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी २०२२ मध्ये फिर्याद दाखल केली होती व त्यानुसार पोलिसांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये एका आरोपीला झारखंड राज्यातून अटक केली होती तसेच त्याच्या साथीदाराला ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. फसवणुकीच्या संदर्भात पोलीस कारवाई करत आहेत.

महावितरणच्या ग्राहकांची सायबर भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे समजले तर स्थानिक पोलीसांकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह