⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | खान्देशात ‘या’ ठिकाणी पडतोय बर्फ!

खान्देशात ‘या’ ठिकाणी पडतोय बर्फ!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ जानेवारी २०२३ | काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, हिमाचल प्रदेशातील मनाली, मसुरी ही बर्फवृष्टी होणारी लोकप्रिय ठिकाणे आपणा सर्वांना माहित आहेतच. महाराष्ट्रात महाबळेश्‍वरसह अन्य एक दोन ठिकाणी थंडीच्या दिवसात सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली दिसते. मात्र खान्देशातही एका ठिकाणी बर्फ पडतो, हे तुम्हाला माहित आहे का? हे ठिकाणी आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ! महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला तापमान चार अंशांखाली गेले आहे. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील डाब, वालंबा या परिसरात दवबिंदू गोठून बर्फाची चादर अंथरल्याचे चित्र दिसून येत आहे.

उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात घट होऊन सर्वत्र थंडी वाढली आहे. निम्मा महाराष्ट्र गारठला आहे. उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवात तसेच काश्मिरातील बर्फवृष्टी यामुळे सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घट झाली. यामुळं कमालीची थंडी वाढली असून, सर्वंत्र हुडहुडी वाढली आहे. गत आठवड्यापासून संपूर्ण खान्देशातील तापमानात मोठी घट झाली आहे. अंगाला झोंबणार्‍या बोचर्‍या वार्‍यामुळे जळगावकर गारठून गेले आहेत. झोंबणारे हे गार वारे थंडीची हुडहुडी वाढवित आहेत. जळगावमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असतांना आता नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये हिमवृष्टीचा अनुभव येत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी घट नोंदविण्यात आली आहे. खान्देशात धुळे व नंदुरबारला तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. नंदुरबारला थंडीमुळे दवबिंदूंचे रुपांतर बर्फाच्या चादरीत झाल्याचे पहावयास मिळाले होते. काही ठिकाणी तर चक्क वाहनांवर, वृक्षवेलींवर, गवतावर आणि भांड्यांमधील पाण्यातही बर्फाचा घट्ट पातळसा थर जमा झाला होता. यामुळे या भागात जणूकाही बर्फवृष्टी झाल्याचा अनुभव येत आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.