⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | खडसेंची ४ कोटींची जमीन आणि ४०० कोटींचा घोटाळा; काय आहे ही भानगड?

खडसेंची ४ कोटींची जमीन आणि ४०० कोटींचा घोटाळा; काय आहे ही भानगड?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ जानेवारी २०२३ | मुक्ताईनगर तालुक्यातील राजकारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अवतीभोवतीच फिरते. दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैय सर्वश्रुत आहे. खडसे असो की आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद विकोपाला गेले आहेत. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्‍या जमीनीतून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. अंदाज ४ कोटींच्या जमीनीत ४०० कोटींचा घोटाळा झाला कसा? व ही नेमकी काय भानगड आहे? असा प्रश्‍न जिल्हावासियांना पडला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात असणार्‍या ३३ हेक्टर ४१आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. त्यानंतर राज्य शासनाकडून या प्रकाराच्या चौकशीसाठी आदेश देण्यात आल्यानंतर भू विज्ञान आणि गौण खनिज विभागाच्या पथकाने कोल्हापूर येथे जावून तपासणी केली आहे. दरम्यान या विषयावरुन दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. मुळात दोन्ही नेत्यांमधील वाद खूप आधीपासून आहे. जेंव्हा खडसे भाजपाचे वजनदार नेते होते तेंव्हा चंद्रकात पाटील हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. राज्यात व केंद्रात भाजप-शिवसेना युती असतांनाही दोन्ही नेत्यांचे पटत नव्हते. तेंव्हापासून आजतयागत दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत.

गौण खनिज घोटाळ्याचे काय आहे प्रकरण?
मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला आहे.

हे आहे खडसेंचे म्हणणे
ज्या जमिनीची तपासणी केली जात आहे ती जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी मी किंवा माझ्या कुटुंबाला नव्हे तर शंभर ते दीडशे शेतकर्‍यांनी दिली आहे. जमीन सपाटी करून करून शेतीसाठी तिचा उपयोग व्हावा हाच त्यामागचा उद्देश होता. यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे उत्खनन कशातून झालं किती झालं याची चौकशी करावी या चौकशीतून काय आहे ते बाहेर येईल, अशी प्रतिक्रीया एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. ४ कोटींच्या जमीन ४०० कोटींचा घोटाळा कसा होवू शकतो? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. आता महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिज उत्खननाची पाहणी केली असून यातून काय निष्पन्न होते? याचे उत्तर येणार्‍या काळात मिळेलच!

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.