⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | अरे देवा…जळगाव जिल्ह्यातील तब्बल इतक्या गावांना बसू शकतो पाणीटंचाईचा चटका

अरे देवा…जळगाव जिल्ह्यातील तब्बल इतक्या गावांना बसू शकतो पाणीटंचाईचा चटका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ जानेवारी २०२३ | गिरणा व तापी नदीच्या काठावर वसलेल्या जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम प्रकल्प ९६ लघुप्रकल्प आहेत. गत दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने बहुतांश प्रकल्प तुडुंब भरतात तरीही जिल्ह्याच्या पाण्याची समस्या सुटत नाही. एप्रिल व मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अनेक गावातील ग्रामस्थांना विशेषत: महिलांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. जिल्ह्यात यंदा ११० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच सिंचन प्रकल्पात पाणीसाठा पुरेसा आहे. पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र तूर्त असले तरी जिल्ह्यातील ४३२ गावांमध्ये संभाव्या पाणीटंचाई जाणवू शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

जळगाव जिल्हातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. या दोन नद्यांवर पाण्याचे गणित अवलंबून आहे. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात गिरणा धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता ६०८ दलघमी एवढी आहे. तर हतनूर धरण क्षमता ३८८ दलघमी इतकी आहे. एकूण सर्व प्रकल्पांच्या साठवण क्षमतेचा विचार केल्यास जिल्ह्यातील साठवण क्षमता १४२७ दलघमी इतकी आहे. असे असले तरी उन्हाळ्यात जिल्ह्याती अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात. एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील सरासरी तापमान ४० ते ४८ अंशादरम्यान असते. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावून पाणीटंचाई निर्माण होते.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र नाही. यंदाही पाऊस १०० टक्क्यांवर झाला आहे. जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर या मोठ्या प्रकल्पांसह लहान प्रकल्पांमध्येही चांगला पाणीसाठा आहे. यामुळे टंचाईची परिस्थिती नसली तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होवू शकते. याकरीता जिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, जिल्ह्यात ४३२ गांवात संभाव्य पाणीटंचाई होणार आहे. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे चोपडा तालुक्यात ७६, त्या खालोखाल जामनेर तालुक्यात ७५ गावे आहेत. सर्वांत कमी गावे जळगाव तालुक्यात सात, रावेर व भुसावळ तालुक्यात ८ गावे आहेत. पाणीटंचाई निवाराणार्थ २ कोटी ३३ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या आराखड्यानुसार, जिल्ह्यात ४३२ गांवात संभाव्य पाणीटंचाई होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११२ गावे, तर दुसर्‍या टप्प्यात ३२० गावांचा सामावेश आहे. या गावांसाठी २ कोटी ३३ लाखांचा टंचाई आराखडा आहे. या गावांमध्ये कूपनलिका तयार करणे, नवीन विंधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, खासगी विहीर अधिग्रहित करणे, विहीर खोली करणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे, टँकर, बेलगाडीने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या
जळगाव-७
भडगाव-१७
भुसावळ-८
बोदवड-१२
चाळीसगाव-३४
चोपडा-७६
धरणगाव-२८
एरंडोल-१५
जामनेर-७५
मुक्ताईनगर-१९
पाचोरा-२५
पारोळा-२८
रावेर-८
यावल-१२

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.