जळगाव लाईव्ह न्यूज | ५ जानेवारी २०२३ | वो मनी माय बबल्या विकस केसांवर फुगे…, सावन ना महिना मा…, हाई झुमका वाली पोर…, देख तुनी बायको कशी नाची रायनी…, माडी वहू तुले येईजाई कर मन्ह लगन…या अहिराणी भाषेतील गाण्यांचा अर्थ काय? हे भले अनेकांना माहित नसलं तरी त्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राने ठेका घेतला आहे. पुर्वी केवळ खान्देशपुरता मर्यादित असलेली अहिराणी भाषेचा डंका आता राज्यभर वाजू लागला आहे. याचं कारण म्हणजे, सर्वत्र धुमाकुळ घालणारी अहिराणी गाणी! खान्देशातील अहिराणी गाणी युट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्रामसह सर्वच ठिकाणी धुमाकुळ घालत आहेत. अहिराणी गाण्यांनी सोशल मीडियावर केवळ नवे रेकॉर्ड स्थापन केले नसून अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीने संपूर्ण राज्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अहिराणी म्हणजेच खान्देशची मायबोली. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिकच्या काही भागांमध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. लग्नसराईत अहिराणी गाण्यांना प्रचंड मागणी असते. अहिराणी गाण्यांशिवाय खान्देशातील लग्नच पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, आजघडीला अहिराणी गाण्यांचं वेड हे केवळ खान्देशपुरताच मर्यादित न राहता राज्यभर अन् राज्याबाहेरही गेलं आहे. सोशल मीडियावर अहिराणी गाण्यांना अल्पावधीत कोट्यावधी व्हूज मिळत आहेत. अहिराणी गाण्यांचं म्युझिक, गाण्यांचे बोल व गाण्यांचे छायाचित्रण करतांना दिलेला सिनेमॅटिक टचमुळे ही गाणी प्रत्येकाच्या पसंतीला उतरतात. सचिन कुमावत, जगदिश संधानशिव, अंजना बर्लेकर, भैय्या मोरे, आण्णा सुरवाडे या कलावंतांनी अहिराणी गाण्यांना संपूर्ण राज्यात पोहचविले आहे.
सचिन कुमावत हे अहिराणी गाण्यांच्या इंडस्ट्रीमधील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी तयार केली आहेत आणि कोट्यवधी प्रेक्षकांनी ती यूट्यूबवर पाहिली देखील आहेत. त्यांच्या ‘बबल्या इकस केसावर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर तब्बल २६ कोटी ६० लाख व्ह्यूज मिळवले होते. ‘सावन ना महिना मा’ या गाण्यालाही तब्बल ९ कोटी ७० लाख व्ह्यूज आहेत. अण्णा सुरवाडे यांनी हे गाणं गायलं आहे. अहिराणी गाण्यांमध्ये सध्या ‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं प्रचंड धुमाकुळ घालत आहे. लग्न, हळदीचा कार्यक्रमासह अन्य कोणतेही सेलिब्रेशन असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. ‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे तयार केले असून भैय्या मोरे व अंजना बर्लेकर हे गायक आहेत. या गाण्यात कलावंत म्हणून विनोद कुमावत व राणी कुमावत यांनी कामं केलं आहे. या गाण्याला यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या एक महिन्यात तब्बल ३ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
विनोद कुमावत यांचे ‘माडी वहू तुले येईजाई कर मनं लगन’ हे वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेलं गाणं आजही तितकचं लोकप्रिय आहे. या गाण्याने गेल्या वर्षभरात ५ कोटी १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. अहिराणी भाषेतील अजून एक लोकप्रिय गाणं ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ या गाण्यावर अनेक रिल्सही सोशल मीडियावर तयार करण्यात आले असून ते प्रचंड व्हायरल होत आहेत. हे गाणं गायिका अंजना बर्लेकर यांनी गायलं आणि त्याच या गाण्याच्या निर्मात्या देखील आहेत. या गाण्याला अंजना यांच्या ऑफिशयल चॅनलवर जवळपाच पावणेसहा कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
‘आते सोडी दे लगण ना नांद मना फुई भाऊ’ हे गायक भैय्या मोरे याचं आणखी एक विनोदी आणि भन्नाट गाणं आहे.
अहिराणीतील काही हिट गाणी
- सावन ना महिना मा
- केसावर फुगे
- माडी वहू तुले येईजाई कर म्हनं लगन
- देख तुनी बायको
- वाकड बबल्या
- फिरी फिरी नाच पोरी
- कर मन्ह लगण
- हाई मोबाईल वाली साली
- गोट्या ना लगीन ले
- मनी नवरी राही खानदेशनी
- पोरं करस येडाचाया
- हाई खानदेशी टमटम
- मन लगीन करी द्या ना मामा
अहिराणी भाषेला प्राचीन प्ररंपरा आणि इतिहास
मराठीच्या बोलीभाषांपैकी प्रमुख एक असलेली बोलीभाषा म्हणजे अहिराणी. प्रचंड गोडवा असलेल्या अहिराणी भाषेला एक मोठी प्राचीन परंपरा आणि इतिहास आहे. म्हणूनच अहिराणी हीदेखील एक स्वतंत्र भाषा म्हणून ओळखली जाते. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात अहिराणी भाषा ही प्रामुख्याने बोलली जाते. अहिराणी ही फक्त बोलीभाषा नसून ती एक संस्कृती आहे. खान्देशातील अहिराणी संस्कृतीमध्ये होणारे पारंपरिक सण-उत्सव, लग्न समारंभ, कानबाई उत्सव, आखाजी अर्थात अक्षय्य तृतीया यातून आपल्याला अहिराणी संस्कृतीचं दर्शन घडत जातं. यादरम्यान म्हटली जाणारी गाणी, जात्यावरच्या ओव्या, म्हणी ही खर्या अर्थाने अहिराणीची ओळख आहे. अहिराणी बोलीभाषेची खरी ओळख ही बहिणाबाई चौधरी यांनी करुन दिली. अगदी साध्या आणि सोप्या ओव्यांच्या माध्यमातून जीवनाचे सार बहिणाबाईंनी सांगितले आहे. मराठी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषा साहित्य संमेलन देखील होतं. याचबरोबर चर्चासत्रे, मुलाखती, कवी संमेलन, नाटक, गाणे, सिनेमा आता अहिराणी भाषेची व्याप्ती वाढवत आहेत. यामुळे अहिराणी भाषा ही दिवसेंदिवस समृध्द होत आहे.