जळगाव लाईव्ह न्यूज | ३० डिसेंबर २०२२ | ग्रामीण भागात शेतकर्यांचा सर्वात आवडता जोडधंदा म्हणजे दूध उत्पादन. दूग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. शेतकर्यांकडे एकवेळी बैलजोडी नसते मात्र दारात किंवा गोठ्यात गाय किंवा म्हैस असतेच. जळगाव जिल्ह्यातील एक गाव असे आहे की, तेथे गावात मतदारांची संख्या कमी आहे पण गायी आणि म्हशी जास्त आहेत. या गावाचे संपूर्ण अर्थकारण दूग्ध व्यवसायावरच चालते. या गावातून दररोज किमान १ हजार ६०० लिटर दूध इतरत्र पाठविले जाते. हे गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा. हे गाव मुक्ताईनगर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार खामखेडा गावाची लोकसंख्या १५४० असून त्यापैकी १०३० मतदार आहेत. यातही गावातील अनेक तरुण नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत. ते तरुण व लोक गावात आहेत ते दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहेत. २०१९च्या पशुगणनेनुसार गावात तब्बल ८२३ म्हशी व २९६ गायी असल्याची नोंद आहे. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात त्यापेक्षा जास्त पशूधन आहे. गत सहा दशकांपासून या गावाने दूध उत्पादक गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या गावात एक सहकारी व एक खासगी दूध डेअरी असून काही तरुण मुक्ताईनगर शहरात घरोघरी जावून दूध विक्री देखील करतात.
मुक्ताईनगर शहराला होणार्या दूध पुरवठ्यात खामखेडा गावाचा मोठा वाटा आहे. या गावातून दररोज किमान दीड हजार लीटरपेक्षा जास्त दूध इतरत्र पाठविले जाते. या गावातील दूध उत्पादक शेतकरी आपल्या पशूधनाची विशेष काळजी घेतात. गायी, म्हशींच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याने खामखेडा गावातील दूूधाची गुणवत्ता खूपच चांगली मानली जाते. यामुळे अनेकजण खामखेडा गावातून येणार्या दूधाला पहिली पसंती देतात. येथील तरुणाईनेही दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग निवडला आहे, जो इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात ५ लाख ७७ हजार ३०२ गायी व २ लाख ६९ हजार १०५ म्हशी आहेत. मात्र यापैकी केवळ १ लाख ५२ हजार ४३९ गायी व १ लाख ५३ हजार ९३० म्हशी पैसासक्षम आहेत. यातून होणार्या दूध उत्पादनात खामखेडा गावाचा मोठा वाटा आहे.
जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तज्ञांचा सल्ला
जनावरांमध्ये दूध वाढवण्यासाठी तज्ञांच्या मते, गव्हाचा लापशी, मक्याचा चारा, जवाचा चारा किंवा कडधान्ये, आणि मोहरी आणि कापूस बियाणे इ. या गोष्टी खाऊ घालाव्यात. या पौष्टिक गोष्टी दररोज जनावरांना खाऊ घालणार्या हिरव्या चार्यात किंवा पेंढ्यामध्ये मिसळणे हा उत्तम मार्ग आहे. साधारणपणे एका जनावराला २० किलो हिरवा चारा, ५ किलो कोरडा चारा आणि २ ते ३ किलो कडधान्ये दररोज द्यावीत. आहार देण्यापूर्वी ते सुमारे ४ तास भिजवले पाहिजे. त्यामुळे जनावरांना अन्न पचण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जनावरांना पौष्टिक आहार देण्याबरोबरच जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता नियमित होते की नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता न केल्यास जनावरांमध्ये आजार पसरतात. अशा परिस्थितीत जनावरांवरही ताण येतो आणि दुधाचे प्रमाण कमी होते.