महावितरणचा ‘तो’ दावा फोल ; भुसावळात घरगुती ग्राहकाला आले 1 लाख 87 हजाराचे विजबिल
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । भुसावळच्या सर्वच परिसरात ग्राहकांच्या घरातील वीज मीटरचे चुकीचे रिडिंग घेतले जात असून वीज बीलांच्या वाटपात दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर ग्राहकांना वीज बिलांचे वाटप केले जात असल्याची तक्रार शहरातील ग्राहकांनी केली आहे. प्रत्येक महिन्यात चुकीचे रिडींग देऊन ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरूच असल्याने चुकीचे मीटर रिडींग देणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. चुकीच्या देयकांमुळे ग्राहक विज बिल भरणा करीत नाही.
चुकीच्या बिलांमुळे ग्राहकांना मानसिक त्रास:
शहरातील जळगाव रोड परिसरात एका वीज मीटरवर (ग्राहक क्रं: ११७७५५००६८५२) सध्या ६२८५ रिडिंग दिसत असताना त्यांना डिसेंबर महिन्याच्या आलेल्या बिलात चालू रिडिंग ६६१७ आलेले आहे. म्हणजेच चक्क ३३२ अतिरिक्त रिडींग दिले. जामनेर रोड परिसरातही (ग्राहक क्रं: ११७७५४०८९७०३) ४४९८ ऐवजी ५१२४ रिडींग आलेले आहे. ६२७ अतिरिक्त रिडींग देण्यात आले. साने गुरुजी नगरात (ग्राहक क्रं: ११७७५०२३५६८३) २२६७ रिडींग असतांना २५९१ रिडींग देण्यात आले आहे. तर काही ग्राहकांना रिडिंग न घेताच बिले देण्यात आली.
खडका रोड विभागात एकाच ग्राहकाला (ग्राहक क्रं:११७७५०२८७३०६) तब्बल १०५७९ रीडिंगचे १,८७,७५० रुपयांचे देयक देण्यात आले. तसेच दुसऱ्या एका ग्राहकाला (ग्राहक क्रं: ११७७५०२३१३८६) ४८२३ रीडिंगचे ८४,५२० रुपयांचे देयक देण्यात आले असून या सर्व ग्राहकांना वीज देयक पाहून मानसिक त्रास होऊ लागला आहे.
रीडिंगमध्ये सुधारणा झाल्याचा महावितरणचा दावा फोल
अचूक बिलिंगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे गेल्या दोन महिन्यांत बिलिंग व रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे, असे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले होते, मात्र भुसावळात रिडिंगमध्ये सुधारणा झालीच नाही, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढला आहे, महावितरणचा दावा फोल ठरला असल्याचे मत प्रा.धिरज पाटील यांनी व्यक्त केले आहे.