हतबल झालेल्या शेतकऱ्याने न्यायालयाच्या आवारातच केला आत्मदहनाचा प्रयत्न, पण..
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । भूसंपादीत जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकऱ्याने भुसावळ न्यायालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत शेतकर्याला ताब्यात घेतले.
दयारास सुनसकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचे धोंडखेडा, ता.बोदवड येथील गट नंबर 32/1985 या जागेचे भूसंपादन झाले असून या जागेचा मोबदला अद्यापही मिळत नाही, त्यामुळे सुनसकर यांनी न्यायालयाच्या आवारात गुरूवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या शेतकर्याची 10 लाख 47 हजार 859 रूपयांची रक्कम शासनाकडून घ्यायची आहे. ही रक्कम न्यायालयातून धनादेशाद्वारे मिळणार असली तरी ती लवकर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते.
सुनसकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने, गुरूवारी सकाळी नऊपासूनच न्यायालयाच्या परीसरात उपनिरीक्षक अंबादास पाथरवट यांच्या सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. न्यायालयाच्या परीसरात सुनसकर येताच त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेत हातातील ल पिशवी ताब्यात घेतली. या पिशवीत आत्मदहनासाठी सुनसकर यांनी दोरी आणली होती, गळफास घेऊन ते आत्मदहन करणार होते.
भूसंपादनाच्या उतार्यावरील जे मृत्यू पावले आहेत त्यांचे मृत्यू दाखले व अन्य कागदपत्रे पूर्ण नसल्याने भूसंपादनाच्या मोबदल्याचा धनादेश मिळालेला नाही. सुनसकर यांचा धनादेश न्यायालयात असून कागदपत्रे पूर्ण झाल्याशिवाय तो मिळत नसल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले, कागदपत्रे पूर्ण केल्यावर आठवडाभरात धनादेश मिळू शकेल, असे पोलिसांनी त्यांना सांगत त्यांना मुलाच्या स्वाधीन त्यांना केले.