Breaking : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक, नेमकं काय आहे प्रकरण?
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. NCP leader Jitendra Awhad Arrested
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसात कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई झाली आहे.कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं.
दरम्यान, या कारवाईनंतर जितेंद्र आव्हाड यांनी एकापाठोपाठ ट्विट केले आहे. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल… असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
तसेच हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. असेही आव्हाड म्हणाले आहे. दरम्यान, आव्हाड यांच्यावरील या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी कोणते पाऊल उचलते हे पाहणे गरजेचे आहे.