जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीचा होणारा त्रास वाढल्याने शहरातील शंकरराव नगरातील महिलांनी आज परीसातून जाणारे अवजड वाहन अडवून परतवून लावत होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्याची मागणी केली आहे.
शंकरराव नगरात दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. यात खडी, विटा, रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणत असते. यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तर विद्यार्थ्यांना सततच्या आवाजाने आभ्यास करता येत नसल्याची व्यथा येथील महिलांनी मांडली.
याबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील कोणीच याची दखल घेत नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. हा रहिवाशी भाग असतांना घरपट्टी भरून देखील महापालिका कोणत्याही प्रकारची सुविधा देत नसून या परिसरात अमृत योजनेचे काम अपूर्ण स्वरुपात ठेवण्यात आल्याचेही या महिलांनी सांगितले. विनिता दुबे यांनी या धुळीच्या त्रासामुळे त्यांची तिन्ही मुले आज देखील आजारी असल्याची व्याथा मांडली.