जळगाव शहर

कुलभूषण भाऊ.. तुम्ही व्यासपीठावर नाही मैदानातच शोभतात!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहराच्या राजकारणात काही वर्षापूर्वी एक तरुण अचानक आला आणि संघटनेत सक्रिय झाला. पाहता पाहता मैदान गाजवू लागला. शिवसेनेत पुढे जात महानगराध्यक्ष झाला. नगरसेवक पदाच्या शर्यतीत हरला परंतु माघार नाही घेतली. गेल्या पंचवार्षिकला नगरसेवक पदाची शर्यत तो तरुण जिंकला आणि अवघ्या अडीच वर्षात मोठी खेळी करीत जळगाव शहराच्या मोठ्या पदावर जाऊन बसला. एकंदरीत आपण गोष्ट करतोय ती कुलभूषण पाटील यांची. अनेक वर्षानंतर आज कुलभूषण पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आणि महासभेत जोरदार बॅटिंग केली.

जळगाव शहरात शिवसेनेचे एक वेगळेच वलय आहे. शिवसेनेत महानगराध्यक्ष असताना कुलभूषण पाटील प्रचंड आक्रमक आणि उत्साह असलेला तरुण होता. कोणत्याही आंदोलनात पुढे राहणे, सिनेमागृहाचा पडदा फाडण्याची हिंमत देखील त्यांनी दाखवली होती. अनेक गुन्हे दाखल झाले तरी कुलभूषण पाटील मागे हटले नाही. राजकारणात सक्रिय झाल्यावर एकदा कुलभूषण पाटलाने नगरसेवक पदाची निवडणूक देखील लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला.

हरल्यावर पराभव न पत्करता त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. भाजपच्या किल्ल्यातून निवडणूक लढवीत आपल्या नावापुढे कुलभूषण पाटलांनी नगरसेवक नाव लावलेच. कुलभूषण पाटील नगरसेवक झाल्यानंतर राज्यात भाजपची सत्ता असल्यावर त्यांना आंदोलन करायला किंवा आवाज उठवायला संधी मिळणे बंद झाले. पुढे अडीच वर्षांनी कुलभूषण पाटलांनी पुन्हा धमका केला आणि मनपात सत्तांतरात मोठी भूमिका बजावली. सत्तांतर होताच कुलभूषण पाटील उपमहापौर झाले आणि मनपा महासभेत व्यासपीठावर दिसू लागले.

राज्याची मुलुख मैदान तोफ पालकमंत्री गुलाबराव पाटील जसे मंत्री झाल्यावर एकदम गार झाले तशीच अवस्था मनपात कुलभूषण पाटलांची झाली. उपमहापौर असल्यावर महासभेत कुलभूषण पाटील व्यासपीठावर बसलेले असल्याने त्यांना आक्रमकपणे न बोलता आपली बाजू न मांडता उलट भूमिका पार पाडावी लागते. महासभेत होत असलेला गोंधळ शांत करण्याची जबाबदारी कुलभूषण पाटलांना महापौरांच्या बरोबरीने पार पाडावी लागते.

शुक्रवारी झालेल्या महासभेत कुलभूषण पाटील पुन्हा एकदा आक्रमक पाहायला मिळाले. घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यावरून चर्चा सुरु झाल्यावर कुलभूषण पाटलांनी व्यासपीठ सोडले आणि सभागृहात उतरले. शिवसेनेच्या मंडळींमध्ये येऊन बसत मनपा प्रशासनाविरुद्ध जोरदार बॅटिंग सुरु केली. विशेषतः शहर अभियंता एम.जी.गिरगावकर यांच्यावर कुलभूषण पाटलांनी शिरसंधान साधले. एका मुद्द्यावरून सुरु झालेली त्यांची तुफान फटकेबाजी अनेक मुद्द्यांवर देखील सुरु होती. एकंदरीत आजच्या महासभेत कुलभूषण पाटलांचा पाहायला मिळालेला अंदाज लक्षात घेता जळगावकरांच्या दृष्टीने ते व्यासपीठावर नव्हे तर महासभेच्या मैदानातच हवे असे अधिक योग्य वाटते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button