राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट ; ऑक्टोबरच्या वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येणार असल्यानं कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनाबाबत शिंदे-फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल.वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या सेवेतील पाच लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १२५०० रुपयांचा बिनव्याजी अग्रीम उचलण्यास मंजुरी दिली होती. २०१८ नंतर हा निर्णय घेण्यात आला होता. १२५०० रुपये दहा हप्त्यांमध्ये परत जमा करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. आता त्यानंतर दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचं वेतन जमा करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.