कुलगुरूच्या हस्ते जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । संशोधन काळाची गरज आहे. आणि तांत्रिक बदल सतत वेगाने सुरु आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला अधिक चालना मिळाली पाहिजे याकरिता अविष्कार संशोधन स्पर्धा २००६ पासून विद्यापीठ व राज्यस्तरावर सुरु आहे.यातून नवनवीन संशोधन जगापुढे येईल असा ठाम आशावाद मला आहे असे विचार कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केले.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा 2022 चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य सं.ना.भारंबे,डॉ.के.जी.खडसे, जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे समन्वयक भूषण कविमंडन, सहसमन्वयक मनोज चोपडा उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी पुढे म्हणाले कि,तीन मुलभूत संकल्पना संशोधक विद्यार्थ्याने पाळल्या पाहिजे आपण जे संशोधन करत आहोत त्यात काय समाविष्ट करायचे आहे. दुसरे सहसंबध आणि तिसरे सादरीकरण यामुळे आपले कार्य योग्य पद्धतीने सादर होईल.विद्यापीठ स्तरावर चार विद्यार्थीभिमुख कार्यक्रम राबवले जातात अविष्कार ज्यात संशोधन,अश्वमेध यात क्रीडा,इंद्रधनुष्य यात सांस्कृतिक आणि आव्हान यात आपत्ती व्यवस्थापन या कार्यक्रमातून विद्यार्थी आपल्या आवडी प्रमाणे सहभाग घेऊन त्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत होते असे सांगितले.
जिल्हास्तरीय अविष्कार पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एस.माहेश्वरी यांच्या हस्ते मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या बास्केटबॉल प्रांगणात व विविध संशोधन मॉडेल्सची पदार्थ विज्ञान प्रशाळेत उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 744 पोस्टर व माॅडेलची नोंदणी झाली आहे. कृषी व पशुसंवर्धन(74), वाणिज्य व्यवस्थापन व विधी(49), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान(85), सामाजिक शास्त्र, भाषा , मानव्यविद्या, ललित कला (176),औषध निर्माण शास्त्र(87), विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, गणित , पर्यावरण शास्त्र , गृह आणि संगणक शास्त्र) (263) अशा एकूण 744 प्रवेशिका आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भूषण कविमंडन तर सूत्रसंचालन विजय लोहार यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.