⁠ 
शनिवार, मे 18, 2024

रश्मी शुल्कांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । मागील काही महिण्यापुर्वी राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ज्या दिवशी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथील ठिय्या आंदोलन स्थगित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असता रश्मी शुक्ला प्रकरणावरून भाजपवर टीका केली.

तब्बल ६८ दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे. मात्र, फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला, हे कारण मला अद्यापही कळले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो, त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू, अशा धमक्या देण्यात आल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती. तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षणसुद्धा दिले होते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. याच प्रकरणाची आठवण करून देत खडसेंनी पोलिसांनी अचानक पोलीस संरक्षण काढून घेतलं होते. असा मुद्दा स्पष्ट करत ज्यांनी ५० खोके ज्यांनी घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार आहेत, अशी टीकाही खडसेंनी राज्य सरकारवर केली.