⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

मनपाच्या कोविड लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करा

जळगावातील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी काय व्यवस्था हवी, नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचना मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी दिल्या.

महापौरांनी केल्या सूचना

लसीकरण केंद्रावर नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रसार माध्यमातून देखील तसे वृत्त प्रकाशित झाले आहे. लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध आहे की नाही याबाबत दर्शनी भागात फलक लावावा, उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी ग्रीन नेट किंवा मंडप टाकावे, बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, मनुष्यबळ वाढवावे, नियोजन ठेवण्यासाठी आवश्यकता असल्यास प्रत्येक लसीकरण केंद्रावर २ महिला, २ पुरुष सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शहरात लसीकरण केंद्रे वाढवा

शहरातील पिंप्राळा, जुने जळगाव, हरीविठ्ठल नगरसह इतर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांना अनुसरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या.

पॉझिटिव्ह रुग्णांचा १०० टक्के शोध घ्या

जळगाव शहरात गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण कुठे आहेत याचा देखील शोध घेतला जात नसल्याची माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व रुग्णांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णांचा शोध घ्यावा आणि जे नियम मोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. दररोज १०० टक्के रुग्ण शोधले जायला हवे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम चोख राबवा

राज्य सरकारने जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहे. जळगाव शहरात देखील मोहीम चोखपणे राबविण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर प्रत्येक घरी जाऊन तपासणी करा. मोहिमेत सहभागी होण्यासाठी जे टाळाटाळ करीत असतील त्यांना नोटीस बजावावी. मोहिमेत फिरणाऱ्या रोजे असलेल्या शिक्षकांना सकाळच्या वेळी आणि दुपारनंतर आपले कार्य पार पाडण्याची सवलत द्यावी. पुढील १५ दिवसात संपूर्ण मोहीम पार पाडण्यात यावी, अशा सूचना देखील महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.