जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ४५ वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाला. तसेच शेतात असलेल्या त्यांच्या पत्नी, सासू आणि दोन मुलेही जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आनंद सुरेश कोळी वय ४५ असे मयत शेतमजुराचे नाव आहे. मृत आनंद कोळी यांचे मांडळ हे सासर होते. पत्नी प्रतिभा आणि दोन मुलासंह गेल्या दहा वर्षांपासून ते मांडळ येथे राहत होते. सासू लटकनबाई कोळी यांच्या शेतात ते भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेले होते. गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने, आनंद कोळी, त्यांची पत्नी प्रतिभा कोळी, मोठा मुलगा राज, लहान मुलगा आणि सासू यांनी कडूनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्याच
वेळी जोराचा आवाज करत वीज झाडावर कोसळली. या घटनेत आनंद कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चौघे जखमी झाले. मांडळ येथील डॉ.शुभम पाटील आणि डॉ.नीलेश जाधव यांनी तपासून सर्वांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. आनंद कोळी यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. तर अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.