जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । गद्दारी केलेल्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसला जाणार नाही. मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटली असली तरी, ती नेहमीसाठी नाहीत. मात्र या जन्मात तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.
आमदारांनी गद्दारी केली तेव्हा कित्येकांना प्रश्न पडला होता की शिवसेनेचे काय होणार? पण माझ्या मनात किंचितही चिंता नव्हती. मात्र आज शिवतीर्थावर बघितल्यावर त्यांच्या मनात प्रश्न पडला असणार. अरे आपल्या गद्दारीचे काय होणार? कारण इथे आणलेला एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या शिवसेनेच्या सभेला आहे. शिवसेनेच्या मेळाव्याला आहे .पण इतका मोठा मेळावा फार क्वचितच होतो. हा अभूतपूर्व मेळावा आहे. मी हे पाहून भारावून गेलो आहे. असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.