जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । पैसे गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. आणि इतर कंपनीच्या नावाखाली अडावद येथील विवाहितेला १६ लाखांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा हिरालाल पाटील (वय ३८, रा.लोणी ता.चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरियाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर आणि इतर कंपनीच्या नावाखाली विनोद पाटील, स्वाती रमेश जाधव, रमेश जाधव (रा.चोपडा), कल्पना बाळू पाटील, बाळू पाटील, गजानन पाटील (रा. पंचक ता.चोपडा) यांनी विश्वास संपादन करुन ३० मे २०१७ ते २०२२ पर्यंत तब्बल १६ लाख २ हजार ५०० रुपयात फसवणूक केली. प्रतिभा पाटील यांनी सोनं, जमीन आणि बचत केलेली रक्कम अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवली होती. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. राजपूत हे करीत आहेत.
फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीने विविध लोकांना कार दिल्याचे तसेच त्यांना कंपनीने लाखो रुपये कमिशनपोटी दिल्याचे बँक स्टेटमेंट कार्यक्रमात दाखविण्यात येत होते. कंपनीच्या संचालकांनी मोठा परतावा आणि इतर लाभ देण्याचे आश्वासन दिल्याने अनेकांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. साडेसात लाख रुपये गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. कंपनीने औरंगाबादेतील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे जून २०१९ मध्ये समोर आले होते. कंपनीने १३ लाख ३१ हजार ६३९ रुपयांची फसवणूक केल्याची पाच जणांनी तक्रार त्यावेळी नोंदवली होती.