जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । गेली काही दिवसापासून महागाईच्या संकटात सापडलेल्या राज्यातील गोरगरीब जनतेला गुड न्यूज मिळणार आहे. ती म्हणजे यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिंदे- फडणवीस सरकारच्या योजनेनुसार, दारिद्रय़ रेषे खालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामलेत आदी वस्तू अतिशय कमी दरात देण्यात येणार आहेत.
दारिद्रय रेषे खालील तब्बल एक कोटी ६२ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांना हे साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच या योजनेला मान्यता देण्यात येईल असे म्हटले जात आहे. दिवाळी फराळाचे साहित्य पात्र कुटुंबांना मोफत द्यायचे की अल्पदरात, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.