जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । सैराट (Sairat) फेम प्रिन्स अर्थातच अभिनेता सूरज पवार (Suraj Pawar) याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्याने मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन एका व्यक्तिला फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची काल सहा तास सुरजची कसून चौकशी करण्यात आली. सोमवारी सुरजला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग आढळ्यास सुरज पवारला अटक होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष दोनजणांनी दिलं होतं. यासाठी ५ लाखांची मागणीही त्याच्याकडून करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला दोन लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. पैशांचं पाकीट देण्यासाठी राहुरी इथे महेश गेले तेव्हा त्यांना आपली फसवणुक होत असल्याची चाहूल लागली. यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी तीन आरोपींना या आधीच अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपींनी सूरजचं नाव घेतलं होतं. यानंतर पोलिसांनी सूरजला चौकशीची नोटीस बजावली होती आणि चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, राहुरी पोलीस ठाण्यात पोलिसांनी सूरजची सहा तास कसून चौकशी केली. सोमवारी पुन्हा त्याची चौकशी होणार आहे.