अग्निवीरच्या भरतीसाठी गेलेल्या खान्देशातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू ; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । अग्निवीरच्या भरतीसाठी गेलेल्या खान्देशातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. रामेश्वर देवरे असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना ठाणे येथील मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडली आहे. दरम्यान, या घटनेचा धक्कादायक VIDEO IBNलोकमतवर प्रकाशित झाला आहे.
काय आहे घटना?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निवीर’ सैन्य भरतीसाठी मंगळवारी रात्री वडजाई, सौंदाणे बाबुळवाडी गावातील एकूण पंचवीस ते तीस मुलं चाळीसगाव येथून भरतीसाठी मुंबई येथे गेले होते. बुधवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास हे सर्वजण कल्याण येथे पोहोचले. तेथून हे तरुण मुंब्रा येथे ‘अग्निवीर’च्या भरतीसाठी जाणार होते.
मात्र, रामेश्वर भरत देवरे याला मळमळ होऊ लागल्याने, तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. वाकून उलटी करीत असतानाच रामेश्वरच्या डोक्याला लोकल ट्रेनची जोराची धडक बसली. तो 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. या दुर्घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्याने, मित्रही घाबरले होते. रामेश्वरच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
रामेश्वर देवरे याचा कॉम्प्युटर डिप्लोमा झाला होता. रिकाम्या वेळेत तो वडिलांना शेतातील कामासाठी मदत करायचा. शेतात पिकवलेला भाजीपाला स्वतः विक्री करून तो आई-वडिलांना मदत करीत होता. नोकरीच्या अपेक्षेने दिवस-रात्र मेहनतही करीत होता. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल, असे वडील सांगत असल्यामुळे त्याने सैन्यात जाण्याची तयारी केली होती. मात्र, देशसेवा करण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तो वडजाईचे उपसरपंच संजय महाराज देवरे यांचा पुतण्या होता.