जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.याच बरोबर दिल्लीतही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुंबईत उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर शाब्दिक तोफ डागली. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडला.
आम्हाला बाप पळवणारी टोळी म्हणता मात्र तुम्ही तर बापाच्या विचाराशीच गद्दारी केली असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणले कि, काहींनी विचारलं की, मालकासोबत जाणार की नोकरासोबत ? हा पक्ष काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेवून जाण्याचे काम करतोय. तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोकर समजणार तर ते सहन केले जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभा केली. त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करत बलिदान दिले आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेना आमची जहागीर आहे, असे सांगण्याचा अधिकार नाही.
याच बरोबर शिंदे म्हणले कि, बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली, वर्षा-मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. खोके वगैरे बोलता, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल? असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.